पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत स्वपक्षाचे नेतृत्व करण्यासाठी माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ  मायदेशी परतल्यानंतर त्यांना आत्मघातकी दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा पाकिस्तानी तालिबान्यांनी दिला आहे.
मायदेशात परतल्यानंतर मुशर्रफ हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य असेल, असा इशारा तहरिक-ए-तालिबान, पाकिस्तानचा प्रवक्ता एहसानउल्लाह एहसान याने एका व्हिडीओ चित्रफितीद्वारे दिला आहे. मुशर्रफ यांनी तालिबान्यांना शरण यावे, असे एहसान याने म्हटले आहे.
मुशर्रफ यांची हत्या करण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. त्यामध्ये सक्रिय सहभाग असलेल्या अदनान रशीद याने म्हटले आहे की, मुशर्रफ यांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघातकी दहशतवाद्यांचा एक विशेष गट तयार करण्यात आला आहे.रशीद हा गेल्या वर्षी कारागृहातून पसार झाला होता. मुशर्रफ यांना लक्ष्य करण्यासाठी तालिबान्यांना प्रशिक्षण देण्यात येत असताना काढण्यात आलेल्या चित्रफितीत रशीद दिसत आहे. ही चित्रफीत पाकिस्तानच्या वायव्य भागांत पत्रकारांना देण्यात आली.
मुशर्रफ यांना धमकी देताना रशीदचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मुशर्रफ यांनी तालिबान्यांना शरण यावे, अन्यथा आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, अशा ठिकाणी लक्ष्य केले जाईल, असा इशाराही रशीद याने दिला आहे. सदर चित्रफीत सहा मिनिटांची असून त्यामध्ये एहसान आणि रशीद यांनी २००७ मध्ये लाल मशिदीवर टाकण्यात आलेल्या लष्करी छाप्याचा उल्लेख केला आहे. आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे वक्तव्य धमकी देताना करण्यात आले आहे.