पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार सुरेश गोपी यांचाही समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच अनेक चर्चा रंगू लागल्या. अनेक वृत्त माध्यमांवर त्यांना मंत्रिपद नको असल्याचं प्रसिद्ध झालं. परंतु, या वृत्तांनंतर त्यांनी आता खुलासा केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार असल्याची चुकीची बातमी काही मीडिया प्लॅटफॉर्म पसरली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत”, असं सुरेश गोपी म्हणाले.

सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. गेल्या वर्षी या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र यंदा सुरेश गोपी यांनी त्रिशूरमध्ये काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला धूळ चारली आहे. लोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी सुरेश गोपी राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. २०१६ ते २०२२ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, पक्षाच्या मतांची टक्केवारी सुमारे ३% वाढली. २०१९ मधील १५% वरून यावेळी १७% झाली.

केरळमध्ये भाजपाचं वर्चस्व नाही. त्यामुळे सुरशे गोपी यांचा विजय भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. सुरेश गोपी हे केरळमधील भाजपाचे पहिले लोकसभेचे खासदार आहेत. ते अभिनेतेही असून त्यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात मंत्रीपदाची शपथ घेतली.

कोण आहेत सुरेश गोपी

सुरेश गोपी हे मुळचे केरळमधील अलप्पुझा येथील रहिवासी आहेत. कोल्लम येथून त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यांनी बालवयापासूनच मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलियाट्टम या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून काही टीव्ही शो होस्ट करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talk of resignation after swearing kerala bjp minister suresh gopi said modi governments sgk