न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या न्यायवृंद पद्धतीवर विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी सातत्याने टीका-टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच रिजिजू यांनी निवृत्त न्यायामूर्तींबाबत एक विधान केलं आहे. देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत, असा गंभीर आरोप रिजिजू यांनी केला आहे. रिजिजू यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. तर, यावरून काँग्रेसने रिजिजू यांच्यावर टीकास्र डागलं आहे.
रिजिजू काय म्हणाले?
एका कार्यक्रमात बोलताना रिजिजू यांनी म्हटलं, “देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत. कार्यकर्ते झालेले हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरोधात उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल,” असा इशारा रिजिजू यांनी दिला.
हेही वाचा : VIDEO : “…मग तेव्हा अटक का नाही केली?”, अमृतपाल सिंगच्या वडिलांचा पंजाब पोलिसांना सवाल
रिजिजू यांच्या विधानानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सडकून टीका केली. ट्वीट करत जयराम रमेश म्हणाले, “विधिमंत्री बेकायदेशीरपणे बोलत आहेत. हे तर अन्यायाचा प्रचार करणारे विधिमंत्री आहेत. यांचं वक्तव्य हे स्वातंत्र्याला धोकादायक नाहीतर काय आहे?,” असा सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : खलिस्तानवाद्यांची धरपकड, अमृतपालच्या ठावठिकाण्याबाबत गूढ; ७८ समर्थक ताब्यात
“न्यायवृंद व्यवस्था हे काँग्रेसचे दु:साहस”
किरेन रिजिजू यांनी सांगितलं, “न्यायमूर्ती प्रशासकीय कामकाजात सहभागी झाले तर न्यायालयाचे कामकाज कोण पाहील. अशा प्रकरणांमध्ये न्यायाधीशांना टीकेला सामोरे जावं लागेल. ज्या नियुक्तींमध्ये न्यायाधीशांचा सहभाग होता, असे प्रकरण न्यायालयासमोर आले तर न्यायदानाचे तत्त्व धोक्यात येईल. न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी करण्यात आलेली न्यायवृंद व्यवस्था हे काँग्रेसचे दु:साहस आहे,” अशी टीकाही रिजिजू यांनी केली.