विश्वासाच्या आधारावरच पाकिस्तानशी पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेला सुरुवात झाली असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी संसदेत केलेल्या निवेदनात सांगितले. दोन्ही देशांना चर्चेच्या माध्यमातूनच पुढे जावे लागेल. तरीही घातपाती कारवायांच्या माध्यमातून चर्चेमध्ये अडथळे आणले जाऊ नयेत, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पाकिस्तानसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील पुन्हा सुरू झालेली चर्चा आणि हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या निमित्ताने सुषमा स्वराज यांचा गेल्या आठवड्यात झालेला पाकिस्तान दौरा या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन सादर करून सदस्यांना माहिती दिली. पॅरिसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वासाच्या आधारावर दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
राज्यसभेमध्ये काँग्रेस आणि बसपच्या सदस्यांनी व्हेलमध्ये जमून केलेल्या घोषणाबाजीवेळी गोंधळातच त्यांनी आपले निवेदन वाचून दाखवले.