तामिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी तडीमल्ला यांनी २५ वर्षं भाजपाच्या सक्रीय सदस्य राहिल्यानंतर पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षातील कार्यपद्धती, नेतेमंडळींची वागणूक व आपल्याला अजिबात सहकार्य मिळत नसल्याची तक्रार करत त्यांनी पक्षातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे. एक्सवर (ट्विटर) त्यांनी यासंदर्भात सविस्तर पत्रच पोस्ट केलं असून त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपल्याला फसवणाऱ्या व्यक्तीलाच पक्षातील काही व्यक्ती सहकार्य करत असून आपल्याला मात्र कोणतीही मदत केली जात नाही, असं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
काय म्हणाल्या गौतमी तडीमल्ला?
अभिनेत्री गौतमी तडीमल्ला यांनी नेमकं काय घडलं याविषयी माहिती दिली आहे. “आपण जड अंत:करणाने आणि प्रचंड मोठ्या भ्रमनिरासामुळे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत. २५ वर्षांपूर्वी मी भाजपामध्ये दाखल झाले होते. माझ्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या असंख्य समस्यांवर मात करून मी पक्षासाठीची बांधिलकी जपली. पण तरीही आज माझ्या आयुष्यातल्या संकटाच्या काळात मला पक्षातून कुणाचाही पाठिंबा नाही. पाठिंबा तर लांब राहिला, पण उलट माझी आयुष्यभराची कमाई फसवणुकीने लाटणाऱ्या व्यक्तीला पक्षातील बरेच लोक मदत करत आहेत”, असं गौतमी यांनी आपल्या जाहीर पत्रात लिहिलं आहे.
“मी १७ वर्षांची असताना अभिनयाला सुरुवात केली. गेल्या ३७ वर्षांपासून मी अथकपणे काम करत आहे. जेणेकरून मा्या मुलीचं आयुष्य सुखात जावं. पण सी. अलगप्पन या व्यक्तीने माझी फसवणूक करून पैसे, मालमत्तेची कागदपत्र स्वत:च्या ताब्यात घेतली”, असा आरोप त्यांनी केला आहे.
२०२४ ला सर्व निवडणुका एकत्र होणार? वाचा नेमकं काय घडतंय…
नेमकी कशी झाली फसवणूक?
अभिनेत्री गौतमी यांनी आपली फसवणूक नेमकी कशी झाली? यासंदर्भातही पत्रात उल्लेख केला आहे. “अलगप्पन याच्याशी माझी २० वर्षांपूर्वी ओळख झाली. एक चांगला माणूस म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासाच्याच आधारावर मी त्याच्याकडे माझ्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रं सोपवली. मला व माझ्या मुलीला कौटुंबिक मित्रत्वाची वागणूक देऊन त्यानं मला फसवलं”, असं गौतमी यांनी नमूद केलं आहे.
अभिनेत्री गौतमी तडीमल्ला यांनी सप्टेंबर महिन्यात चेन्नई पोलिसांत सी अलगप्पन व त्याची पत्नी ए. एल. नाकल यांच्याविरोधात २५ कोटींची मालमत्ता लाटल्याची तक्रार दाखल केली आहे. “२५ वर्षं प्रामाणिकपणे पक्षाचं काम केल्यानंतर पक्षाकडून कोणतीही मदत न मिळणं हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. उलट गेल्या ४० दिवसांपासून अलगप्पनला फरार होण्यासाठी आणि पोलिसांपासून बचाव करण्यासाठी भारतीय जनता पक्षातील काही लोक मदत करत आहेत”, असा थेट आरोप गोतमी यांनी केला आहे.