पुन्हा जयललिताच; द्रमुक-काँग्रेस आघाडीचा पराभव
तामिळनाडूत सत्ताधारी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नोत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाच्या नेत्या आणि मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी आपली सत्ता अबाधित राखत इतिहास घडवला. अण्णा द्रमुक किंवा द्रमुक यांच्याकडे पाच वर्षांनी सत्ता येण्याचा इतिहास होता. तीन दशकांनी ही परंपरा मोडीत निघाली. द्रविड मुन्न्ोत्र कळघम व काँग्रेस यांच्या आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात जयललिता यांना यावेळी पुन्हा यश मिळाले आहे.
राज्यात विधानसभेच्या २३२ जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. जयललिता यांच्या अण्णा द्रमुकने १३४ जागा जिंकल्या. तर द्रमुक-काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी ९७ जागा जिंकत जयललितांना जोरदार टक्कर दिली.
राज्यातील बहुतेक मतदारसंघांत या निवडणुकीत बहुरंगी लढती अनुभवण्यास मिळाल्या. जयललिता यांचा अण्णा द्रमुक, द्रमुक-काँग्रेस आघाडी, तसेच चित्रपटसृष्टीतून राजकारणात उतरलेले विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाची आघाडी, भाजप आणि पीएमके अशा पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यात डीएमडीके पक्षाच्या आघाडीचा बराचसा बोलबोला झाला होता. डीएमडीकेने माकप, भाकप, व्हीसीके, टीएमसी अशा पक्षांची मोट बांधली होती. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.
शहरी मतदारांचा जयललितांना पाठिंबा ..
निकालांचे विश्लेषण करता असे लक्षात येते की, चेन्नई सोडता अन्य शहरी भागांतील मतदारांनी जयललिता यांच्या अण्णा द्रमुकला पाठिंबा मिळाला. चेन्नईत आलेल्या पुरामुळे मतदारांचा कौल सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेल्याचे दिसून येते.
मदुराई, त्रिची, सालेम या शहरांतही जयललितांना मोठा पाठिंबा मिळाला. मदुराई या राज्यातील तिसऱ्या मोठय़ा शहरातील एक सोडून सर्व जागा अण्णा द्रमुकला मिळाल्या आहेत.
यंदा पहिल्यांदाच द्रमुकच्या रुपाने प्रबळ विरोधी पक्ष असेल असे द्रमुकचे खजिनदार एम.के.स्टॅलीन यांनी स्पष्ट केले.
‘माझ्यावरील विश्वास पन्हा प्रकट करून आणखी एकदा सत्तेत येण्याची संधी दिल्याबद्दल मी राज्याच्या मतदारांचे मनापासून आभार मानते.’
– जयललिता, एआयएडीएमके नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री
‘द्रमुकने काही निमशहरी भागांत आपला प्रभाव राखण्यात यश मिळवले आहे. काही ठिकाणी त्यांच्या मतांमध्ये गेल्या वेळीपेक्षा वाढ झाली आहे. पण शहरी भागातील सुशिक्षित आणि तटस्थ मतदारांनी एआयएडीएमकेच्या बाजूने मतदान करण्याचा किंवा मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने जयललिता यांच्या पक्षाला लाभ झाला.
– एस. बालमुरुगन, राज्य सचिव, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज
विरोधकांचे आरोप फोल ..
राज्यात गुंतवणूक खेचून आणण्यात, रोजगारनिर्मिती करण्यात आणि मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले अपयश हे जयललिता यांच्यावरील महत्त्वाचे आरोप होते. मात्र मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेच निवडणूक निकालांनी दाखवून दिले.
निमशहरी आणि ग्रामीण भागांत द्रमुकला फायदा ..
मात्र या शहरी भागांच्या परिघावरील निमशहरी आणि ग्रामीण भागांत द्रमुकला अधिक पाठिंबा मिळाल्याचे दिसून येते. तिरुनेल्वेली, पलयमकोट्टाई, तुतिकोरीन आणि विरुधुनगर या छोटय़ा शहरांमध्ये द्रमुकचे उमेदवार यशस्वी झाले आहेत. शिक्षणसंस्थांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिचीमध्ये डीएमकेला एका भागात विजय नोंदवता आला. मात्र शहरातील अन्य ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना अपयश आले.