पुन्हा जयललिताच; द्रमुक-काँग्रेस आघाडीचा पराभव
तामिळनाडूत सत्ताधारी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नोत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाच्या नेत्या आणि मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी आपली सत्ता अबाधित राखत इतिहास घडवला. अण्णा द्रमुक किंवा द्रमुक यांच्याकडे पाच वर्षांनी सत्ता येण्याचा इतिहास होता. तीन दशकांनी ही परंपरा मोडीत निघाली. द्रविड मुन्न्ोत्र कळघम व काँग्रेस यांच्या आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात जयललिता यांना यावेळी पुन्हा यश मिळाले आहे.
राज्यात विधानसभेच्या २३२ जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. जयललिता यांच्या अण्णा द्रमुकने १३४ जागा जिंकल्या. तर द्रमुक-काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी ९७ जागा जिंकत जयललितांना जोरदार टक्कर दिली.
राज्यातील बहुतेक मतदारसंघांत या निवडणुकीत बहुरंगी लढती अनुभवण्यास मिळाल्या. जयललिता यांचा अण्णा द्रमुक, द्रमुक-काँग्रेस आघाडी, तसेच चित्रपटसृष्टीतून राजकारणात उतरलेले विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाची आघाडी, भाजप आणि पीएमके अशा पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यात डीएमडीके पक्षाच्या आघाडीचा बराचसा बोलबोला झाला होता. डीएमडीकेने माकप, भाकप, व्हीसीके, टीएमसी अशा पक्षांची मोट बांधली होती. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.
शहरी मतदारांचा जयललितांना पाठिंबा ..
निकालांचे विश्लेषण करता असे लक्षात येते की, चेन्नई सोडता अन्य शहरी भागांतील मतदारांनी जयललिता यांच्या अण्णा द्रमुकला पाठिंबा मिळाला. चेन्नईत आलेल्या पुरामुळे मतदारांचा कौल सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेल्याचे दिसून येते.
मदुराई, त्रिची, सालेम या शहरांतही जयललितांना मोठा पाठिंबा मिळाला. मदुराई या राज्यातील तिसऱ्या मोठय़ा शहरातील एक सोडून सर्व जागा अण्णा द्रमुकला मिळाल्या आहेत.
यंदा पहिल्यांदाच द्रमुकच्या रुपाने प्रबळ विरोधी पक्ष असेल असे द्रमुकचे खजिनदार एम.के.स्टॅलीन यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा