Chennai : डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळाल्या आहेत. आता अशीच एक घटना तामिळनाडूमधील चेन्नई शहरात घडली आहे. चेन्नईमधील सरकारी रुग्णालयात बुधवारी सकाळी एका तरुणाने रुग्णालयातील एका डॉक्टरवर चाकूने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या तरुणाने डॉक्टरवर तब्बल सात वार केल्याची माहिती सांगितली जाते. दरम्यान, या हल्ल्याच्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयातील सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अनेकांनी या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.
नेमकी काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई शहरातील एका रूग्णालयात २६ वर्षीय विघ्नेश या तरुणाच्या कॅन्सरग्रस्त आईवर उपचार सुरु होते. यावेळी विघ्नेश आणि त्याचे तीन मित्र कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या विघ्नेशच्या आईला भेटण्यासाठी सकाळी १०.३० च्या सुमारास रुग्णालयात दाखल आले. यावेळी त्यांनी आईच्या तब्येतीबाबत डॉक्टर जगन्नाथ यांना विचारणा केली. मात्र, यावेळी त्या तरुणांचा डॉक्टरबरोबर शाब्दिक वाद झाला. यानंतर त्या विघ्नेशने डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यानंतर विघ्नेशने चाकू काढला आणि डॉक्टर जगन्नाथ यांच्यावर हल्ला केला.
हेही वाचा : अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
हा हल्ला करताना डॉक्टरच्या मानेवर जवळपास सात वार केले. यावेळी डॉक्टरच्या डोक्याला आणि शरीरावरही जखमा केल्या. मात्र, ही घटना घडत असतानाच त्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवत आरोपीला पकडलं. त्यानंतर जखमी झालेल्या डॉक्टरला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करत उपचार सुरु करण्यात आले. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्या विघ्नेशबरोबरच्या तरुणांचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.
#WATCH | Tamil Nadu Deputy CM Udhayanidhi Stalin visits Kalaignar Centenary Multy speciality government hospital in Chennai where a 25-year-old man stabbed a doctor who was on duty today. pic.twitter.com/1QjyQ00Aco
— ANI (@ANI) November 13, 2024
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
ही घटना घडल्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी देखील हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया देत जखमी डॉक्टरांवर आवश्यक ते उपचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच या सर्व घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी ते म्हणाले की, “आमच्या सरकारी डॉक्टरांचे निस्वार्थी कार्य अतुलनीय आहे. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं हे आमचं कर्तव्य आहे”, असं म्हणत स्टॅलिन यांनी अशा घटना टाळण्यासाठी भविष्यात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.