पीटीआय, चेन्नई
समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरल्याबद्दल तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी हे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत करण्याचा आणि धार्मिक हिंसा भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप स्टॅलिन यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी भोपाळच्या सभेमध्ये समान नागरी कायद्याचा पुरस्कार केला होता.
‘एका देशात दोन कायदे नसावेत असे पंतप्रधान म्हणत आहेत, ते धार्मिक भावना भडकावून आणि देशामध्ये गोंधळ माजवून २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप स्टॅलिन यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून धडा शिकवा असे आवाहन त्यांनी लोकांना केले. भाजपला पराभूत करण्यासाठी पाटण्यामध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीमुळे मोदी यांना भीती वाटत आहे असे ते म्हणाले.
मणिपूर गेल्या ५० दिवसांपासून जळत असताना पंतप्रधानांना समान नागरी कायदा महत्त्वाचा वाटत आहे अशी टीकाही स्टॅलिन यांनी केली. मोदी यांनी घराणेशाहीवरून केलेल्या टीकेला ‘त्यांनी आमच्यावर कुटुंबाचे राजकारण करण्याचा आरोप केला. द्रमुक हा अनेक कुटुंबांनी तयार झालेलाच पक्ष आहे. त्याचा उल्लेख केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो’, अशा शब्दांमध्ये त्यांनी उत्तर दिले.