तामिळनाडूमध्ये सध्या राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एम के स्टॅलिन यांचे पुत्र आणि युवा कल्याण, क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातम धर्मावर टीका केली होती. त्यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांची देशभरात चांगलीच चर्चा झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यावरील कामाचा भार कमी व्हावा, म्हणून उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या चर्चांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मुख्यमंत्री एम के स्टॅलिन किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यांनी दिलेली नाही. मात्र, २२ ऑगस्टच्या आधी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल, असं सांगितलं जात आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका पाहता उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर ही जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगितली जात आहे.
हेही वाचा : जावेद अख्तर संतापले, “जर्मनीत नाझी…”; पोलिसांनी कावड यात्रेबाबत दिलेल्या सूचनेबाबत काय म्हणाले?
उदयनिधी स्टॅलिन का आले होते चर्चेत?
उदयनिधी स्टॅलिन यांनी २ सप्टेंबर रोजी तमिळनाडूतील चेन्नई येथे एका सभेला संबोधित करताना समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर विधान केलं होतं. त्यांनी बोलताना सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू, करोना विषाणूशी तुलना केली होती. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिका त्यांनी मांडली. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं.
उदयनिधी वक्तव्यावर ठाम राहिले होते
उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानामुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तरीही ते त्यांच्या मतावर ठाम राहिले होते. मात्र, माझ्या विधानाची मोडतोड केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच मी कोणत्याही खटल्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, त्यांच्यावर भाजपासह देशभरातली राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीकेजी झोड उठवली होती. तसेच त्यांच्या सनातन धर्माविरोधात टिप्पणी केल्यामुळे त्यांना मंत्री पदावरून दूर करण्याची मागणीही करण्यात येत होती. तसेच उच्च न्यायालयानेही उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांनी केलेल्या सनातन धर्मावरील टिप्पणीबाबत सुनावलं होतं.