Tamil Nadu Collector AP Mahabharathi : तमिळनाडूच्या मयिलादुथुराई जिल्ह्यातील तीन वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण व तिच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे जिल्हाभरातून संतापाची लाट उसळळी आहे. जिल्ह्यातील सीरकाजी येथील एका लहान मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणावर भाष्य करताना जिल्हाधिकारी म्हणाले, “पीडित मुलीच्या कृतीमुळे अथवा वागण्यामुळे हल्लेखोर असं करण्यास प्रवृत्त झाला असेल. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मुलगी आरोपीच्या तोंडावर थुंकली होती. मुलीची ही कृती पुढच्या घटनेला कारणीभूत ठरलेली असू शकते”. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वक्तव्यानंतर जनतेतून संतापाची लाट उसळली. त्यानंतर, प्रशासनाने तातडीने पावलं उचलत जिल्हाधिकाऱ्याची बदली केली आहे. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यावर असंवेदनशीलता दाखवल्याचा आरोप केला होता.
जिल्हाधिकारी ए. पी. महाभारती लहान मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीप्रती सहानुभूती व्यक्त करत म्हणाले की “अशा प्रकरणांमध्ये आपण दोन्ही बाजू तपासून पाहायला हव्यात. मुलांचं वय असं असतं की आपण त्यांना समजावू शकतो, शिकवू शकतो. मुलांच्या आई-वडिलांनी याकडे लक्ष द्यायला हवं. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी त्यांचीच असते. या विषयांवर संवेदनशीलता वाढायला हवी आणि लोकांना जागरुक करायला हवं”. जिल्हाधिकाऱ्यांचं हे वक्तव्य समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केला आहे की ते पीडितेला दोषी ठरवत तिच्याप्रती असंवेदनशीलता दाखवत आहेत आणि आरोपीचा अधिक विचार करत आहेत.
विरोधकांचा जिल्हाधिकाऱ्यांसह सरकारवर हल्लाबोल
तमिळनाडू भाजपा अध्यक्ष अन्नामलाई यांनी जिल्हाधिकारी महाभारती यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ते म्हणाले, “केवळ साडेतीन वर्षांच्या त्या मुलीने गुन्हेगाराला लैंगिक शोषण करायला प्रवृत्त केलं असेल हे जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य किळसवाणं आहे. मी तमिळनाडू भाजपाच्या वतीने महाभारती यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवतो”. अन्नामलाई यांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांविरोधातील अपराधांचं वाढलेलं प्रमाण, लैंगिक अत्याचारांच्या वाढलेल्या घटना पाहून राज्य सरकारची किव येते. महिला, शाळकरी मुली आणि चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री या सगळ्या घटनांबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत. मंत्री पीडितांची ओळख उघड करून असंवेदनशीलता दाखवत आहेत. एका जिल्हाधिकाऱ्याने केलेलं हे वक्तव्य असंवेदनशीलतेचा कळसच आहे. खरंतर ही या सरकारचीच प्रवृत्ती आहे.