Crime News : देशभरात दररोज रेल्वेने लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. खरं तर रेल्वेचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास असतो. मात्र, अनेकवेळा रेल्वेने प्रवास करत असताना अनेकदा वेगवेगळ्या घटनाही समोर येतात. आता अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. तामिळनाडूच्या तिरुपत्तूरमध्ये रेल्वेत चार महिन्यांच्या गर्भवती महिलेचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेने प्रवास करत असलेल्या दोन तरुणांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
तिरुपत्तूरच्या जोलारपेट्टईजवळ ही घटना घडली. एक चार महिन्यांची गर्भवती महिला रेल्वेने प्रवास करत होती. मात्र, याच वेळी महिला प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या डब्यातून आणखी दोन तरुण प्रवास करत होते. प्रवास करत असताना दोन तरुणांनी त्या गर्भवती महिलेचे लैंगिक शोषण केले. ही महिला आंध्र प्रदेशातील चित्तूरला जात होती. यावेळी शुक्रवारी पहाटे तिरुपत्तूर जिल्ह्यातील जोलारपेट्टईजवळ दोन पुरुषांनी लैंगिक अत्याचार केला. ही महिला ट्रेनच्या वॉशरूममध्ये जात असताना दोघांनी तिला अडवलं आणि अत्याचार केला. यावेळी तिने मदतीसाठी आरडाओरडा केला असता त्या दोन तरुणांनी तिला वेल्लोर जिल्ह्यातील केव्ही कुप्पम जवळ ट्रेनमधून खाली ढकलून दिलं आहे. या घटनेमुळे तामिळनाडूत खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर घटनेप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. कोईम्बतूरमधील एका कपड्यांच्या कंपनीत काम करणारी ही महिला चित्तूरला जात असताना ही घटना घडली. या घटनेत या महिलेचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी वेल्लोर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हेमराज नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच इतर गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलीस सीसीटीव्ही तपासण्याचं काम करत आहेत.
दरम्यान, एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर सडकून टीका त्यांनी केली. ते म्हणाले, “गरोदर महिलेवर दोन पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिने ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ट्रेनमधून ढकलून दिले ही घटना अतिशय धक्कादायक आहे. तामिळनाडूतील महिला रस्त्यावर सुरक्षितपणे चालू शकत नाहीत, शाळा, महाविद्यालये किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि आता ट्रेननेही प्रवास करू शकत नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा अत्याचारांच्या घटना म्हणजे राज्य सरकारचे अपयश असून सरकारने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी”, असं एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी म्हटलं आहे.