Tamil Nadu Governor RN Ravi: तमिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी आणि तमिळनाडूच्या राज्य सरकारदरम्यान अनेकदा खटके उडाले आहेत. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना समज देत त्यांनी अडवून ठेवलेल्या १० विधेयकांना थेट मंजूरी दिली. आता राज्यपाल आरएन रवी पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मदुराई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितले. कंब रामायण लिहिणाऱ्या एका प्राचीन कवीचा उल्लेख करत असताना त्या कवीच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी जय श्री राम म्हणावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

राज्यपालांच्या आवाहनाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्यांच्यावर द्रमुकच्या नेत्यांकडून आता टीका होऊ लागली आहे. “आज आपण प्रभू श्रीरामाच्या महान भक्ताला वंदन करूयात आणि त्यांच्या सन्मानार्थ जय श्री रामच्या घोषणा देऊयात”, असे राज्यपालांनी म्हटले.

राज्यपालांच्या या कृतीवर द्रमुक सरकारकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे वागत आहेत, अशी टीका द्रमुकच्या नेत्यांनी केली.

द्रमुक पक्षाचे प्रवक्ते धरणीधरन म्हणाले की, राज्यपालांची कृती ही देशाच्या धर्मनिरपेक्ष विचारांच्या विरोधात आहे. राज्यपाल वारंवार संविधानाचे उल्लंघन का करत आहेत? त्यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? ते संघाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे वागत आहेत. राज्यपालांनी देशाच्या संघ रचनेचे उल्लंघन केले असून त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांची कानउघाडणी केली. हे सर्वांनी पाहिले.

दरम्यान काँग्रेसचे आमदार असन मौलाना यांनीही राज्यपालांवर टीका केली. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना ते म्हणाले, राज्यपाल एका धर्मगुरूप्रमाणे बोलत असून ते धार्मिक विचारांना खतपाणी घालत आहेत. देशातील एका महत्त्वाच्या संवैधानिक पदावर ते बसलेले आहेत. मात्र तरीही त्यांनी एका धर्मगुरूप्रमाणे विधान केले. भारतात विविध धर्म, विविध भाषा आणि पंथ आहेत. तरीही राज्यपाल विद्यार्थ्यांना जय श्री रामच्या घोषणा द्यायला सांगून विषमतेला प्रोत्साहन देत आहेत.

राज्यपाल धार्मिक विचारसरणीचा प्रचार करत असून असे कृत्य या पदाला शोभत नाही. मात्र राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे प्रचारक बनले आहेत, अशीही टीका असन मौलाना यांनी केली.