राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेवर परावर्तित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला २४ तास उलटत नाहीत तोच सातही आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने बुधवारी जाहीर केला. तीन दिवसांत या सर्वाची सुटका होणार आहे. जयललिता सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
राजीव यांचे मारेकरी संतनम्, मुरुगन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत परावर्तित केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेत सातही आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय घेतला.
जयललिता यांनी स्वत विधानसभेत ही माहिती दिली. जयललितांच्या या निर्णयानंतर देशभरात खळबळ उडाली. काँग्रेसने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या सर्व आरोपींची तीन दिवसांनी सुटका करण्यात येणार आहे.
राहुलना क्लेश
माझे वडील लोकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत यासाठीच आग्रही होते आणि त्यांचीच हत्या करणाऱ्यांना मुक्त करण्याच्या सरकारी निर्णयामुळे मी व्यथित झालो आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी आरोपींना फाशी देण्याच्या निर्णयाला आपला विरोध कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही घटनातज्ज्ञांशी सल्लामसलत केली. त्यानंतरच सातही आरोपींच्या सुटकेचा निर्णय घेतला. केंद्र सरकारला या निर्णयाची माहिती देण्यात आली असून यासंबंधी केंद्राकडून काही उत्तर न आल्यास राज्य सरकार आपल्या अधिकारात सातही आरोपींना मुक्त करील.
– जयललिता, मुख्यमंत्री, तामिळनाडू