Tamil Nadu drops official rupee symbol from state Budget : तमिळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर वाद सुरू आहे. यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तमिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपया चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई (तमिळमध्ये रुपये) मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

१४ मार्च रोजी राज्य विधानसभेत सादर होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पाचा टीझर एमके स्टॅलिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “समाजातील सर्व घटकांच्या लाभाकरिता तमिळनाडूचा व्यापक विकास करण्यासाठी…”. या टिझरमध्ये सुरूवातीला रुपयाचे बदलेले चिन्ह पाहायला मिळत आहे.

या पोस्टबरोबर त्यांनी ‘द्रविडियन मॉडेल’ आणि ‘TNBudget2025’ हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. तसेच बजेटच्या लोगोमध्ये हिंदी वर्णमालेतील ‘र’ पासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेले रुपयाचे चिन्ह (₹) वापरण्यात आलेले नाही. मागील दोन अर्थसंकल्पांमध्ये लोगोमध्ये रुपयाच्या चिन्हाचा वापर करण्यात आला होता. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावेळी देखील हे रुपयाचे चिन्ह (₹) वापरण्यात आले होते.

राष्ट्रीय चलनाचे चिन्ह वापरण्यास एखाद्या राज्याने नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. एनईपी आणि तीन भाषांच्या सूत्राला तमिळनाडू सरकार विरोध करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

भाजपाचे तमिळनाडूचे भाजपाचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी रुपयाचे चिन्ह बदलण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री स्टॅलिन आणि तमिळनाडू सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “डीएमके सरकारचा राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये तमिळ व्यक्तीने बनवलेले रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले, जे की संपूर्ण भारताने स्वीकारले आणि आपल्या चलनात समाविष्ट केले.” तसेच या चिन्हाची रचना करणारे उदय कुमार हे डीएमकेच्या माजी आमदाराचे पुत्र असल्याची बाबा नमूद करत अन्नामलाई यांनी विचारले, “एमके स्टॅलिन तुम्ही आणखी किती मूर्ख होणार?” अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी देखील स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे. “उदय कुमार धर्मलिंगम हे एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि डिझायनर आहेत, जे द्रमुकच्या माजी आमदाराचे पुत्र आहेत, ज्यांनी भारतीय रुपयाचे (₹) चिन्ह डिझाइन केले होते, जे भारताने स्वीकारले होते. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन तमिळनाडूच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह वगळून तमिळ लोकांचा अपमान करत आहेत. एखादी गोष्ट किती हास्यास्पद होऊ शकते?”

Story img Loader