पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत आणि सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. रोज सकाळी तुम्ही टीव्ही लावला की पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याची सर्वात पहिली बातमी पाहायला मिळते. अशात जर तुम्हाला कोणी 5 लिटर पेट्रोल गिफ्ट म्हणून दिलं तर….
हो, तामिळनाडूमध्ये एका विवाहादरम्यान असाच अनोखा प्रकार पाहायला मिळालाय. नवरदेवाच्या मित्रांनी चक्क महागडे गिफ्ट म्हणून पाच लिटर पेट्रोल भरलेला कॅन दिला. तामिळनाडूतील टीव्ही चॅनल ‘पुथिया तलाईमुरई’च्या वृत्तानुसार येथे एका लग्न समारंभात नवदांपत्य पाहुण्यांकडून शुभेच्छा स्वीकारत असताना, नवरदेवाचे काही मित्र तेथे आले. त्यांनी चक्क पाच लिटर पेट्रोलने भरलेला कॅन नवरदेव आणि त्याच्या नवविवाहित पत्नीच्या हातात दिला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इतकं ‘महागडं’ गिफ्ट पाहून नवरा-नवरीसह उपस्थितांना हसू आवरणं कठीण झालं होतं. अखेर हास्यमय वातावरणात नवरदेवानेही मोठ्या आनंदात ते महागडं गिफ्ट स्वीकारलं. या घटनेचा 39 सेकंदाचा व्हिडीओही चॅनलवर चालवण्यात आला.
तामिळनाडूमध्ये पेट्रोलचे दर 85.15 रुपये प्रति लीटर झाले आहेत. तर आज पुन्हा एकदा देशभरात इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे मोदी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोल प्रति लिटरमागे १५ पैशांनी महागले. तर डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे सात पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ८९. ४४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.३३ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे.