Tamil Nadu : तामिळनाडूमधील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका फ्रेंच महिलेला टेकडीवर नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिला एका पर्यटक गाईडसोबत २६६८ फूट उंच दीपमलाई टेकडीवर गेली होती. त्या ठिकाणी पर्यटक गाईडने त्या महिलेला एका निर्जनस्थळी गुहेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे तिरुवन्नामलाई जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

फ्रान्समधून एक ४६ वर्षीय महिला जानेवारीत तिरुवन्नामलाई जिल्ह्यात आली होती. या ठिकाणी ती एका खासगी आश्रमात राहत होती. दरम्यान, गेल्या वर्षी भूस्खलनानंतर दीपमलाई टेकडीवर सार्वजनिक प्रवेशावर बंदी आहे. मात्र, तरीही तिने २,६६८ फूट उंच टेकडीवर चढाई केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ध्यान करण्यासाठी तिने एका पर्यटक गाईडबरोबर गुहेत प्रवेश केला होता. पण यावेळी वेंकटेशन नावाच्या पर्यटक मार्गदर्शकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, पर्यटक गाईडने तिच्यावर लैंगिक अत्याचार करताना ती महिला त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर तिरुवन्नामलाई पोलिसांकडे तिने तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. तसेच पोलिसांनी पर्यटक गाईड वेंकटेशला अटक केली आहे. तसेच पीडितेला उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

दरम्यान, तिरुवन्नामलाई जिल्ह्याला आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखलं जातं. येथे अन्नामलाईयार मंदिर आणि रमण महर्षी आश्रम यासह १४ पवित्र स्थळे आहेत. आध्यात्मिक जागृती शोधणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी हे दीर्घकाळापासून एक लोकप्रिय ठिकाण मानलं जातं. अनेक जण जिल्ह्यात दीर्घकाळ राहतात. मात्र, एका परदेशी महिलेबरोबर येथे धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. मोक्ष मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका टेकडीवर नेत फ्रेंच महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पर्यटक मार्गदर्शकाला अटक केली आहे.

Story img Loader