ना कुठली जात ना कोणताही धर्म नसलेली तामिळनाडूची स्नेहा ही भारतातील पहिली महिला बनली आहे. व्यवसायाने वकील असलेल्या स्नेहाने स्वत:चे ‘नो कास्ट, नो रिलिजन’चे प्रमाणपण मिळवले आहे. देशात असे पहिल्यांदाच घडले आहे. हे ऐकायला जरी सोपे वाटत असले तरी स्नेहाला यासाठी तब्बल ९ वर्षांची प्रदीर्घ लढाई लढावी लागली आहे. सोशल मीडियावर स्नेहाचे मोठे कौतुक होत आहे. इतकेच काय अभिनयातून राजकारणात प्रवेश केलेले कमल हसन यांनीही तिची बातमी शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्नेहा तामिळनाडूतील वेल्लोरमधील तिरूपत्तूर येथील आहे. स्नेहाच नव्हे तर तिचे आई-वडीलही बालपणापासूनच सर्व प्रमाणापत्रांवर जाती आणि धर्माचा कॉलम रिकामा सोडत असत.

स्नेहाने एका मुलाखतीत सांगितले की, मी नेहमी स्वत:ला भारतीय मानत आले. मी कधीच स्वत:ला जाती धर्मात बांधून घेतले नाही. प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे मला जाणवले होते. त्यामुळे मला शपथपत्र मिळवायचेच होते. कारण त्यामुळे मी कुठल्याच जाती आणि धर्माशी निगडीत नसल्याचे मला सिद्ध करता येत होते.

२०१० मध्ये स्नेहाने ‘नो कास्ट, नो रिलिजन’साठी अर्ज केला होता. ५ फेब्रुवारी २०१९ ला मोठ्या अडचणीनंतर तिला हे प्रमाणपत्र मिळाले. असे प्रमाणपत्र मिळवणारी स्नेहा ही पहिली व्यक्ती आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्नेहाने सरकारी कार्यालयांच्या सातत्याने चकरा मारल्या. तिच्या प्रयत्नांना अखेर यश आले. तिरूपत्तूरचे उपजिल्हाधिकारी बी प्रियंका पंकजम यांनी सर्वांत आधी तिच्या भावना समजावून घेतल्या आणि त्यांनी हे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली.

स्नेहा आपल्या तिन्ही मुलींच्या अर्जात जाती आणि धर्माचा कॉलम रिकामा सोडते. भारतासारख्या देशात शाळेत प्रवेश घेण्यापासून ते मृत्यूच्या प्रमाणपत्रापर्यंत जाती, धर्माबाबत विचारणा केली जाते. अशा वेळी स्नेहाने उचललेले पाऊल हे खरंच कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu woman becomes first indian to get no caste no religion certificate