अंमलबजावणी संचालनालयाने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी तमिळनाडूत अनेक ठिकाणी मंगळवारी रात्री छापेमारी केली. या छापेमारीनंतर ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना अटक केली. परंतु पोलीस कोठडीत असताना चौकशीदरम्यान अचानक त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या छातीत दुखत होतं. त्यांच्यावर सध्या चेन्नईतल्या ओमंदुरार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीने मंगळवारी सचिवालयासह बालाजी यांच्या कार्यालयासह त्यांचा गृह जिल्हा करूरमध्येदेखील छापेमारी केली. पाच वर्षातली ईडीची सचिवालयामधील ही दुसरी छापेमारी आहे. बालाजी यांच्यावरील कारवाईनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

स्टॅलिन म्हणाले, सत्ताधारी भाजपा त्यांच्या विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा ज्या लोकांचा सामना करू शकत नाही त्यांना मागल्या दाराने धमकावण्याचं राजकारण करते. परंतु त्यात ते यशस्वी होणार नाहीत. हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल. बालाजी यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिलं होतं. परंतु मला एक गोष्ट समजली नाही की, सचिवालयात मंत्र्यांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्याची काय गरज होती.

द्रमुक पक्षानेही या कावाईचा निषेध नोंदवला आहे. द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सचिव आर. एस. भारती म्हणाले की, पक्षाने यापूर्वी असे अनेक छापे पाहिले आहेत, परंतु त्यांच्या नेत्यांवर कोणतेही आरोप याआधी सिद्ध झालेले नाहीत. हा केवळ पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे ही वाचा >> ज्याच्या मृत्यूच्या बातमीने अख्ख्या गावावर शोककळा पसरली, तोच चार महिन्यांनी ढाब्यावर मोमोज खाताना दिसला

सुप्रीम कोर्टाने बालाजी यांच्याविरोधात कथित कॅश फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी पोलीस आणि ईडीला तपासाचे आदेश दिले आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत ही छापेमारी केली असल्याचं सांगितलं आहे. बालाजी हे वीजेसह राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचेही मंत्री आहेत. बालाजी म्हणाले की, ईडीचे अधिकारी नेमकं काय शोधत आहेत ते मला माहिती नाही. या तपासात यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वास मी त्यांना दिलं आहे. बालाजी याआधी अण्णाद्रमुक पक्षात होते. दिवंगत जयललिता यांच्या सरकारमध्ये त्यांनी परिवहन मंत्री म्हणून काम केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamilnadu electricity minister v senthil balaji breaks down ed took custody money laundering case asc
Show comments