देशात इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच तामिळनाडू सरकारनं सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर ३ रुपयांनी कमी केले आहेत. तामिळनाडूतील स्टालिन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सामान्य जनतेला फायदा होणार आहे. तामिळनाडूचे अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली.

“तामिळनाडूत २.६ कोटी लोकं दुचाकी वापरतात. सामान्य नागरिकांचा विचार करता आम्ही पेट्रोलच्या किंमती ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारला १,१६० कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे”, असं अर्थमत्री पी. थैगा राजन यांनी सांगितलं.

देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा भाव १०१.८४ रुपये आणि डिझेलचा भाव ८९.८७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आणि डिझेलचा भाव ९७.४५ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव १०२.०८ रुपये आणि डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ आणि डिझेलचा भाव प्रति लिटर ९४.३९ रुपये आहे. तामिळनाडुत पेट्रोलचे दर कमी झाल्याने आता महाराष्ट्रातील जनताही राज्य सरकारकडे आस लावून बसली आहे.

Story img Loader