Parliament Winter Session 2023 Updates : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेत आज अचानक गोंधळ झाला. खासदार शुन्य प्रहारात आपलं म्हणणं मांडत असताना प्रेक्षक गॅलरीतून एका तरुणाने उडी मारून पिवळ्या रंगाचा धूर सोडला. यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. या प्रकारानंतर संसदेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, या घटनेत दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एका महिलेने संसद परिसरात घोषणाबाजी केली.
संसदेत घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. नीलम (४५) आणि अमोल शिंदे (२५) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही मोठ्या घोषणा केल्या. “तानाशाही नहीं चलेगी (हुकुमशाही नाही चालणार.) मणिपूरबाबत न्याय द्या. महिलांवरील अत्याचार नाही चालणार. भारत माता की जय, हुकुमशाही बंद करा. जय भीम, जय भारत, महिलांवरील अत्याचार नाही चालणार. वंदे मातरम.” अशा घोषणा या दोघांनी केल्या.
हेही वाचा >> “लोकसभेत घुसून त्या दोन तरुणांनी जो पिवळा धूर पसरवला तो..”, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली महत्त्वाची माहिती
याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा प्रकार कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याची चौकशी केली जाईल. या घोषणाबाजीत मणिपूरचा उल्लेख असल्याने त्यादृष्टीनेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा हेसुद्धा घटनेनंतर संसदेत दाखल झाले होते.
नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत संसदेत गोंधळ झाला तेव्हा उपस्थित होते. ते म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.
काय म्हणाले ओम बिर्ला?
“लोकसभेत शून्य प्रहरात जी घटना घडली होती त्याबाबत आपल्या सगळ्यांनाच चिंता होती आणि आहे. लोकसभा या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी करते आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांनाही आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपल्या सगळ्यांना जी चिंता वाटत होती की ज्या धुराचे लोट पसरवण्यात आले तो धूर नेमका काय होता? प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की तो धूर सर्वसाधारण धुराप्रमाणेच होता. फक्त काहीतरी गदारोळ घडला पाहिजे या उद्देशाने या धुराचे लोट पसरवले गेले. तो धूर हा चिंतेचा विषय नाही, प्राथमिक चौकशीच्या नंतरच मी हे आपणाला सांगतो आहे.” असं ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलं.