Ghaziabad Viral Video : खरं तर सर्वजण बाहेरचं जेवण आवडीने खातात. पण हॉटेलच्या जेवणात अळी किंवा इतर किटक सापडल्याचे अनेक प्रकार घडल्याचं पाहायला मिळतं. यासंदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत. तसेच अनेकवेळा आपण हॉटेलमध्ये जेवताना तेथील साफसफाई, स्वच्छता पाहत नाही, या संदर्भातील देखील काही किळसवाणे प्रकारही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. आता देखील एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका हॉटेलमध्ये थुंकून तंदूर रोट्या बनवण्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली-मेरठ मार्गावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित हॉटेल बंद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, हॉटेलमध्ये थुंकून तंदूर रोट्या बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत थुंकून तंदूर रोट्या बनवणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. रविवारी रात्री काही लोक हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या व्यक्तींनी काढला आणि त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीला ताब्यात घेतलं.
VIDEO: गाजियाबाद में थूक लगाकर रोटी बनाने वाला कैमरे में कैद, हरकत में आई पुलिस; इस होटल का है मामला#Ghaziabad #VideoViral pic.twitter.com/Ff7JrOPpxJ
— Kapil Kumar (@KapilKumar77025) March 17, 2025
दरम्यान, पोलिसांनी तक्रार नोंदवून इसरार नावाच्या व्यक्तीला अटक केली. इसरार हा कच्छी सराई कॉलनी येथील रहिवासी आहे. आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला देखील अशाच एका घटनेत गाझियाबादमधील आणखी एका व्यक्तीला लग्नात रोट्यांवर थुंकताना एका कथित व्हिडिओनंतर अटक करण्यात आली होती. त्यामुळे आता हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांची पोलीस पडताळणी करण्यात आली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.