ट्रान्सजेंडरने मुलींचं बाथरुम वापरलं म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तृतीयपंथीय व्यक्तीला अटक केली आहे. Marcy Rheintge असं या तृतीयपंथीयाचं नाव असून ही घटना फ्लोरिडामधली आहे.
नेमकी घटना काय घडली?
मर्सी नावाच्या २० वर्षीय ट्रान्सजेंडरला अटक करण्यात आली आहे. महिलांचं प्रसाधनगृह वापरल्याने अशा प्रकारे अटक करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. तृतीयपंथीय विद्यार्थी असलेल्या मर्सीने फ्लोरिडा येथील महाविद्यालयात असलेल्या महिलांच्या प्रसाधनगृहाचा वापर केला होता. या प्रकरणात या तृतीयपंथीयाला अटक झाली आहे. मी कायदा मोडला असल्याने मला अटक झाली आहे असं मर्सीने म्हटलं आहे. ही घटना मागच्या महिन्यात १९ मार्चला घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
मर्सी रिंटगेनने मागच्या महिन्यात १९ मार्चला तल्लाहासी येथील महिला प्रसाधनगृहात प्रवेश केला. मी कायदा मोडण्यासाठी आल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे पोलीस तिथे होतेच. पोलिसांनी या मर्सीला आधीच ताकीद दिली होती. मात्र मर्सीने हात धुतल्यानंतर विनंती करुनही जाण्यास नकार दिला त्यानंतर तिला अटक कऱण्यात आली असं कॅपिटल पोलिसांनी सांगितलं.
मर्सीवर गैरवर्तनाचा गुन्हा दाखल
मर्सीचं वास्तव्य इलिनॉयमध्ये असतं. मर्सीवर गैरवर्तनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मर्सीला ६० दिवसांच्या कारवासाची शिक्षा होऊ शकते. मे महिन्यात मर्सीला न्यायालयात हजर केलं जाईल. मी त्या ठिकाणी जाऊन हात धुतले होते जर हे वागणं चुकीचं असेल तर अशा पद्धतीने जगणं कठीण होऊन जाईल असं मर्सीने म्हटलं आहे. दरम्यान मर्सी अशा प्रकारच्या गुन्ह्यात अटक होणारी पहिलीच ट्रान्सजेंडर आहे.
मर्सीच्या वकिलांचं म्हणणं काय?
फ्लोरिडा आणि युटामध्ये स्वच्छतागृहांच्या वापरांबाबत काही विशेष तरतुदी आहेत. स्वच्छतागृहांवरचे हे निर्बंध पाळणं बंधनकारक समजलं जातं. दरम्यान मर्सीच्या अटकेमुळे या घटनेकडे कायदेशीर गटांचं आणि नागरिक हक्कांचं रक्षण करणाऱ्या संघटनांचं लक्ष वेधलं गेलं आहे. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनचे वरिष्ठ सदस्य जॉन डेव्हिडसन यांच्या मते मर्सीला महिला स्वच्छतागृहाचा वापर केल्याने जी अटक झाली ती फ्लोरिडातली अशा प्रकारची पहिलीच कारवाई आहे. मर्सीच्या वकिलांचं या अटकेबाबत असं म्हणणं आहे की अशा प्रकारची कारवाई चूक आहे. ज्या कायद्यांचा आधार घेऊन मर्सीला अटक करण्यात आली आहे ते कायदे आता अलबामा, नॉर्थ डकोटा, कॅन्सास यांसारख्या राज्यांमध्ये पुस्तकातच उरले आहेत, त्यांची अमलबजावणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. बहुतांश वेळा हे कायदे सरकारी नियमांच्या उल्लंघनापेक्षाही नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर अवलंबून असतात.