९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत सुरु आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच मराठी टिकवणं आवश्यक आहे त्यासाठी दहावीपर्यंत मुलांना मराठी माध्यमांत शिक्षण दिलं गेलं पाहिजे, आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत असंही मत तारा भवाळकर यांनी मांडलं.

काय म्हणाल्या तारा भवाळकर?

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आपण मराठी लोकांनी साजरा केला. सगळ्यांप्रमाणेच मलाही आनंद झाला. कारण कुठलाही शासकीय दर्जा मिळाला की काही फायदे होत असतात. भाषेसाठी काही कोष राखीव ठेवला जाईल. आपल्या मराठी भाषेचा विकास व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. तसंच इतरही अपेक्षा आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषा शिक्षणातून कमी होत चालली आहे, ती केवळ पालक इंग्रजी शाळेत घालतात म्हणून नाही तर मराठी शाळा बंद पडत आहेत त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत ही वस्तुस्थिती आहे. ज्या मराठी माध्यमांच्या खासगी शाळा आहेत त्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही. शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे गुणवान शिक्षक यायला नको म्हणतात. पालक जबाबदार निश्तिच आहेत पण व्यवस्थाही जबाबदार आहे.”

फी भरुनही मुलांना चांगली शाळा मिळत नाही ही वस्तुस्थिती-तारा भवाळकर

आमची पिढी नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, कमी फीच्या शाळेत शिकलो आहोत. आता फी भरुनही मुलांना शाळा चांगली मिळत नाही. कारण अनेक तरतुदी नाही. शारिरीक विधींसाठी मुलींसाठी व्यवस्थित सोय नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत. मराठी भाषा टिकवायची असेल तर उत्सव जरुर करावा, कविता म्हणाव्यात. पण त्याचवेळी व्यावहारिक गोष्टी विचारात घेणं महत्त्वाचं आहे. तसंच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दहावीपर्यंतचं शिक्षण ते मराठी माध्यमांतूनच झालं पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवलं जातं, पण ते दुय्यम मराठी म्हणून वेगळं पुस्तकं केली जातात. मराठी मुलं ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळांमधून उच्च मराठीचीच पुस्तकं असली पाहिजेत. इंग्रजी माध्यमांची शाळा असली तरीही, मी शिक्षण क्षेत्रात ४५ वर्षे काम केल्यानंतर मी सांगते आहे. महाविद्यालयांमधून जे शिकवलं जातं त्यांनंतर जे शिक्षक तयार होतात त्यांना तासिका तत्त्वावर शिकवावं लागतं. मराठी माध्यमांतून शिक्षण दिलं जाणं ही आमची प्रमुख मागणी आहे. ज्या पालकांचा गैरसमज असेल की मराठीतून शिक्षण घेतल्यावर पोटापाण्याची नीट सोय होत नाही त्यांचा अपसमज दूर करणं आवश्यक आहे.

अमेरिका आपल्या मुलांना हाकलत असेल तर त्यात गैर काय?

इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेतलं की आमची पोरं परदेशी जात आहेत. आता अमेरिकेत काय चाललं आहे ते पाहतो आहोत. आपण जर बिहारी मुलांना मुंबईतून हाकलत असू तर आमच्या मुलांना अमेरिकेने का हाकलू नये? असाही सवाल यावेळी तारा भवाळकर यांनी केला. अभिजात मराठी उत्सवाने वाढणार नाही. मराठी वाचणारी, बोलणारी पिढी घडवावी लागेल. आज काल श्रमकऱ्यांची मुलं आज मम्मी आणि पप्पा म्हणताना दिसत आहेत. साहेब या देशात होता तोपर्यंत आपण गुलाम होतो, आता आपण साहेबाळलो की काय? असं मला वाटतं. असंही स्पष्ट मत तारा भवाळकर यांनी मांडलं.

Story img Loader