विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या दंगलखोरांवरी गुन्हे मागे घेण्यास नकार दिल्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडून आपल्याला मुद्दामहून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप राजस्थानमधील आयपीएस अधिकारी पंकज चौधरी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे वसुंधरा राजे पुन्हा एकदा अडचणीत सापडल्या आहेत.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या दंगलखोरांना सोडून देण्यात यावे, यासाठी माझ्यावर सरकारच्या सर्व स्तरांतून दबाव टाकण्यात आला. अनेक वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकाऱयांनी माझ्यावर दबाव टाकला. या दंगलखोरांना सोडून द्यावे आणि मुस्लिमांविरूद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असा दबाव माझ्यावर टाकल्याचे चौधरी यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे. या कारणामुळेच आपली बुंदीच्या पोलीस अधीक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली, असेही त्यांनी म्हटले आहे.
चौधरी सध्या नवी दिल्लीत राजस्थान सशस्त्र सेनेचे प्रमुख आहेत. बुंदीतील नैनवा आणि खानपूरमध्ये १२ सप्टेंबर २०१४ रोजी उसळलेल्या दंगली योग्य प्रकारे हाताळल्या नाहीत, म्हणून राज्य सरकारने त्यांच्यावर आरोपपत्र ठेवले आहे.
दरम्यान, चौधरी यांच्या आरोपांबद्दल राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्हणाले, ते काहीही बोलायला मोकळे आहेत. त्यांच्याकडून आम्हाला अधिकृतपणे काही उत्तर मिळाले, तर त्याचा तपास करून कारवाई केली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Targeted by vasundhara raje govt for acting against vhp bajrang dal rioters ips officer