Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचा अनेक देशांना मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. टॅरिफचा परिणाम अनेक देशांतील शेअर बाजारावर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील ७० देशांवर आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाचे परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाले आणि त्यानंतर जगभरात मोठा गदारोळ निर्माण झाला. यानंतर अखेर ट्रम्प प्रशासनाने बहुसंख्य देशांवरील आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवरील आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली असली तरी चीनवरील आयातशुल्क थेट १२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील ‘टॅरिफ वॉर’ आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आधी १०४ टक्के आयात कराची घोषणा केली आणि त्यानंतर चीननेही जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकेवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याची घोषणा केली होती. यानंतर आता अमेरिकेने चीनवरील आयातशुल्क थेट १२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे संकेत दिले. यानंतर आता चीनने पुन्हा एकदा अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चीन आता शनिवारपासून अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लादणार असल्याची माहिती समोर आली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. वृत्तानुसार, चीनच्या अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, बीजिंग शनिवारपासून अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लादणार आहे. हा कर आधी जाहीर केलेल्या ८४ टक्के करांपेक्षा जास्त असेल. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने अनेक देशांवरील ९० दिवसांसाठी कर स्थगित करण्याचा निर्णय घेतला, पण चीनला या निर्णयातून वगळण्यात आलं. यानंतर आता चीननेही मोठा निर्णय घेत अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
चीनच्या अर्थ मंत्रालयाने काय म्हटलं?
“चीनवर अमेरिकेने लादलेले अतिरिक्त आयातशुल्क हे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यापार नियमांचं उल्लंघन आहे. हे निर्णय पूर्णपणे एकतर्फी आणि जबरदस्तीचे आहेत”, असं चीनच्या अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
अमेरिकेचा भारताला दिलासा! २६ टक्के आयात कराला ९ जुलैपर्यंत स्थगिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये त्यांनी भारतावर २६ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, व्हाईट हाऊसच्या कार्यकारी आदेशांनुसार, अमेरिकेने ९ जुलैपर्यंत भारतासह इतर काही देशांवरील अतिरिक्त व्यापार कर ९० दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली आहे. २ एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला निर्यात करणाऱ्या वस्तूंवर ६० हून अधिक देशांवर व्यापार कर लादले होते. याचबरोबर भारतासारख्या देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादले होते. ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असलेल्या भारताच्या कोळंबीपासून ते स्टीलपर्यंतच्या उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अतिरिक्त व्यापारकर वाढीचा हा आदेश ९ एप्रिलपासून लागू झाला होता, परंतु ट्रम्प यांनी आता तो ९० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे.