Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांच्या निर्णयांचा फटका अनेक देशांना बसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचा अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. एवढंच नाही तर टॅरिफचा परिणाम अनेक देशांच्या शेअर बाजारावरही होत आहे. यातच अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अमेरिकेने चीनवर आधी ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. त्यानंतर चीननेही अमेरिकन वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनी मालावर १०४ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला. यानंतर आता चीननेही मोठी घोषणा करत अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चिनी आयातीवरील १०४ टक्के शुल्क लादल्यानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याची घोषणा केल्यामुळे याचा फटका आता जगभरातील आणखी काही देशांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.अमेरिका आणि चीनमधील हे ‘टॅरिफ वॉर’ आणखी तीव्र होत असून याचा परिणाम जागतिक व्यापारावर होण्याची शक्यता आहे.

चीनने अमेरिकेवर आधी हे शुल्क ३४ टक्के लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिकेने चिनी आयातीवरील १०४ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्याने चीनने पुन्हा प्रत्युत्तरात अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के वाढीव शुल्क लादण्याची घोषणा केली. यासंदर्भात चीनच्या अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, “चीनवर अमेरिकेने वाढवलेले शुल्क ही एक चूक आहे. जी चीनच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे गंभीर उल्लंघन करते आणि नियमांवर आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणालीला गंभीरपणे कमकुवत करते”, असं म्हटलं आहे.