Tariff War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांचं प्रशासन घेत असलेल्या निर्णयांचा फटाका जगातील अनेक देशांना बसत आहे. एवढंच नाही तर अनेक देशांवर ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ (आयात शुल्क) लादल्यामुळे याचे परिणाम पाहायला मिळाले. यावरून संपूर्ण अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अखेर ट्रम्प यांनी काहीशी माघार घेत बहुसंख्य देशांवरील आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली. पण या निर्णयामधून चीनला वगळलं. सध्या चीन आणि अमेरिकेमधील हे टॅरिफ युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असं असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सेमीकंडक्टर चिप्ससह विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना परस्पर करातून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. या संदर्भात अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार, ही उत्पादने चीनवर लावण्यात येणाऱ्या सध्याच्या १४५ टक्के करांच्या किंवा इतरत्र लावण्यात येणाऱ्या १० टक्के कराच्या अधीन राहणार नाहीत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना त्यांच्या नव्याने लादलेल्या परस्पर करांमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन, लॅपटॉपसह २० वस्तूंना यामधून वगळण्यात येणार आहे. तसेच बहुतेक सूट मिळालेली उत्पादने अमेरिकेत कमी प्रमाणात उत्पादित केली जातात. या निर्णयाचे स्वागत अॅपल आणि सॅमसंगसह इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांकडूनही होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चीन-अमेरिका टॅरिफ युद्ध कसं सुरू झालं?
चीन हा जगातील सर्वात मोठा वस्तुनिर्माता देश म्हणून ओळखला जातो. लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते आयटी क्षेत्रापर्यंतच्या सर्वच वस्तू चीनमध्ये तयार होतात. दुसरीकडे अमेरिकेची बाजारपेठ ही सर्वात मोठी मानली जाते, त्यामुळे चिनी वस्तूंवरील किमती दुपटीने वाढवणे अमेरिकेसाठी सोपी बाब नाही; तर चीनलाही अमेरिकेसारखी सर्वात मोठी बाजारपेठ गमावणे परवडणारे नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरही अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं होतं. त्यावेळी चीनने संयमाची भूमिका घेत अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं नव्हतं.
चीनचे अमेरिकेला जशास तसं उत्तर
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चिनी वस्तूंवर तब्बल १४५ टक्क्यांपर्यंत आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. यावेळी मात्र चीनचा संयम सुटला आणि शुक्रवारी बीजिंगने अमेरिकेवर जोरदार हल्लाबोल केला. ट्रम्प यांच्या धोरणाची खिल्ली उडवत चीनने देशात आयात होणाऱ्या अमेरिकन वस्तूंवरील कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले. वृत्तानुसार, अमेरिकेने या आठवड्यात प्रथम चिनी वस्तूंवर ५४ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता, नंतर त्यात दोन टप्प्यात १४५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली.