China On US Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (आयातशुल्क) धोरणावरून सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील ७० देशांवर आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर जगभरात मोठा गदारोळ निर्माण झाला. यानंतर अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीशी माघार घेत बहुसंख्य देशांवरील आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली. मात्र, यामधून चीनला वगळण्यात आलं. त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला.

ट्रम्प प्रशासनाने चीनवर आधी ३४ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. पण अमेरिकेच्या या निर्णयाला चीनने जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा चीनवर १०४ टक्के आयात कर लादण्याची घोषणा केली. यानंतर चीननेही अमेरिकेवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याची घोषणा केली. यानंतर अमेरिकेने चीनवरील आयातशुल्क थेट १४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं स्पष्ट केलं. यानंतर चीनने पुन्हा एकदा अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकन वस्तूंवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यातील या ‘टॅरिफ वॉर’चा फटका जगभरातील देशांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिकेने १४५ टक्के आयातशुल्क लादल्याच्या घोषनेनंतर चीनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता चीनने भारतानंतर युरोपियन महासंघाला एकत्रितपणे या विरोधात लढण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, अमेरिकेने युरोपियन महासंघालाही आयातशुल्क लादलं होतं. मात्र, युरोपियन महासंघाने प्रत्युत्तर दिल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय ९० दिवसांसाठी स्थगित केला, याचा उल्लेख करत चीनने युरोपियन महासंघाला हे आवाहन केलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. मात्र, जर अमेरिका बेपर्वा वागत असेल तर चीन हे व्यापार युद्ध लढण्यास तयार असल्याचंही चीनने म्हटलं आहे.

अमेरिकेच्या या व्यापार कर युद्धाच्या विरोधात लढण्यासाठी आणि ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत व चीनने एकत्र आलं पाहिजे, असं चीनने म्हटलं होतं. यानंतर आता चीनने युरोपियन महासंघालाही एकत्रितपणे लढण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धातून बाहेर पडण्यासाठी युरोपियन महासंघ आणि चीनने एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

शी जिनपिंग यांनी काय म्हटलं?

स्पेनचे पंतप्रधान अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांच्याशी बीजिंगमध्ये झालेल्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युरोपियन महासंघाला चीनसोबत एकत्र काम करण्याचं आवाहन केलं. जेणेकरून ते अमेरिकेबरोबरच्या वाढत्या व्यापार वादाचा सामना करू शकतील. शी जिनपिंग यांनी म्हटलं की, “चीन आणि युरोपने संयुक्तपणे त्यांच्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आणि अमेरिकेच्या एकतर्फी धमकी देणाऱ्या धोरणांना संयुक्तपणे विरोध केला पाहिजे. तसेच यामुळे दोन्ही पक्षांचे हक्क आणि हितसंबंध जपले जातीलच. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय आणि समानता देखील बळकट होईल.”

स्पेनच्या पंतप्रधानांनी काय म्हटलं?

स्पेनच्या पंतप्रधानांनी म्हटलं की, “व्यापारावरून सुरू असलेल्या तणावामुळे युरोपियन महासंघ आणि चीनमधील सहकार्य थांबू नये. स्पेन आणि युरोप चीनसोबतचा व्यापार गमावत आहेत. आपण या व्यापार तणावाला आपल्या परस्पर संबंधांमध्ये आणि भविष्यातील सहकार्यात अडथळा बनू देऊ नये”, असं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी म्हटलं आहे.