कारागृहामध्ये मोबाईल फोन आणि सिमकार्ड आढळल्यामुळे गोवा पोलीसांनी ‘तेहलका’चे संपादक तरूण तेजपाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहकारी तरुणीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तेजपाल सध्या गोव्यातील सादा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
तुरुंग अधीक्षक गौरीश शंखवालकर यांनी २४ फेब्रुवारी रोजी कारागृहाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना तेजपाल यांच्यासह अन्य दोघांकडे मोबाईल फोन आढळले होते. त्यानंतर त्यांनी नियमाप्रमाणे तक्रार दाखल केल्यानंतर तेजपाल यांच्यासह अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हेगारी कट रचल्याचा आणि कारागृहात प्रतिबंधित वस्तू बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
तुरुंग अधीक्षकांनी केलेल्या पाहणीमध्ये एकूण सात मोबाईल आढळले होते. त्यापैकी एक स्वतः तेजपाल यांच्याकडे होता. स्वतःकडे मोबाईल बाळगून तेजपाल न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू शकतात. त्याचप्रमाणे ते साक्षीदारांवरही प्रभाव टाकू शकतात, असे तेजपाल यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
तेजपाल यांच्याकडीन फोनवरून कोणा कोणाला फोन करण्यात आले होते, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. तेजपाल यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

Story img Loader