चालू महिन्यात गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्यावेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये सहकारी महिला पत्रकाराशी लैंगिक गैरवर्तन करणारे तहलकाचे संपादक तरूण तेजपाल शुक्रवारी नाटय़मय घडामोडीनंतर शुक्रवारी गोव्यात दाखल झाले. त्यांना येथील सत्र न्यायालयाने शनिवार सकाळपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. दरम्यान, गोवा व दिल्ली पोलिसांनी आज त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी छापे टाकले तरीही ते हाती लागले नाहीत. दुपारी तेजपाल गोव्याकडे जाणाऱ्या विमानात बसले व हजरही झाले. जिल्हा व सत्र न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी त्यांना अटकेपासून शनिवारी सकाळपर्यंत संरक्षण देणारा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या अटकेसाठी अजामीनपात्र अटक वॉरंट काढणाऱ्या न्यायमूर्तीनी शुक्रवारी त्यांना दुपारी २.३० वाजेपर्यंत उपस्थित राहण्याची मुभा देताना अटकेस स्थगिती दिली होती.
तेजपाल शुक्रवारी दुपारी अडीच वाजता गोव्याकडे जाणाऱ्या विमानात बसले. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी गीता बत्रा व इतर कुटुंबीय तसेच वकील होते. विमानात बसण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, गोवा पोलिसांचे समन्स आल्याने आपण जात आहोत. तेजपाल यांना भाजपच्या युवक कार्यकर्त्यांनी दाबोलिम विमानतळावर काळे झेंडे दाखवले. तेजपाल हे चौकशीत सहकार्य करतील, त्यासाठी ते येथे आले आहेत, असे तेजपाल यांच्या वकील लुथरा यांनी सांगितले.
तेजपाल यांच्या वकीलाचा युक्तीवाद
युक्तिवादाच्या वेळी तेजपाल यांच्या वकील लुथरा यांनी दोनदा पीडित तरूणीचे नाव घेतले, त्याला सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. न्यायाधीशांनी लगेच त्यांना पीडित मुलीचे नाव घेणे योग्य नाही असे सांगितले. तेजपाल यांच्या वकील लुथरा यांनी सांगितले की, बलात्कार, विनयभंग व ताब्यातील महिलेवर बलात्कार हे आरोप तेजपाल यांच्यावर करण्यात आले आहेत, ते पाहता फारच विचित्र पद्धत या खटल्यात वापरलेली दिसते. यात काहीतरी राजकीय हेतू असावा असे आमचे म्हणणे आहे. सरकारी वकील शनिवारी बाजू मांडणार आहेत.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक दक्षिण दिल्ली येथे जनपुरा भागात तेजपाल यांच्या निवासस्थानी आले व ९० मिनिटे त्यांनी तपासणी केली. तेजपाल यांच्या पत्नीने ते कुठे गेले आहेत हे सांगितले नाही. सकाळी साडेसहा वाजता हे पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
दरम्यान, तेजपाल प्रकरणी आपण गोवा सरकारच्या अहवालाची वाट पाहात आहोत, असे गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी सांगितले. तेजपाल शरणागती पत्करण्याऐवजी अटक टाळत आहेत, यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा