एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणावरून ‘तहलका’चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्यावर कारवाईसाठीचा दबाव वाढत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा सरकारने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगानेही याप्रकरणी लक्ष घातले आहे. त्यामुळे लवकरच याप्रकऱणी रितसर तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणी पोलिसांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश  देण्यात आलेले आहेत. केले गेलेल्या आरोपांमध्ये पोलिसांना तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही पर्रिकर म्हणाले.
याआधी संबंधित प्रकरणावरून तेजपाल यांनी सहा महिने पद सोडण्याचा निर्णय घेतला. तसा ईमेल त्यांनी सर्व सहकाऱ्यांना पाठविला आहे. ‘तहलका’च्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांना पाठविलेल्या या पत्रात तेजपाल म्हणतात की, या पत्रकार महिलेची याआधीच मी माफी मागितली आहेच. पण नुसत्या शाब्दिक माफिनाम्यापेक्षा अधिक काही करायची इच्छा आहे. परिस्थितीच्या आकलनात माझ्याकडूनच चूक झाल्याने ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे मी सहा महिन्यांसाठी संपादक पदावरून स्वेच्छेने दूर होत आहे. अर्थात ‘परिस्थितीच्या आकलना’पेक्षाही तेजपाल यांच्याकडून अधिक गंभीर चूक झाली असून गोव्यात ‘थिंक फेस्टिव्हल’ला गेलो असताना तेजपाल यांनी दोनदा माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, असे या महिलेने चौधरी यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.

Story img Loader