तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची सोमवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वैद्यकीय (लैंगिक क्षमता) चाचणी करण्यात आली. ती सकारात्मक आली आहे. तेजपाल यांनी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी गोवा येथील पंचतारांकित हॉटेलात सहकारी महिला पत्रकाराशी गैरवर्तन केले होते. ५० वर्षे वयाच्या तेजपाल यांना या प्रकरणी येथील न्यायालयाने रविवारी सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांचे पाच तास जाबजबाब घेतले.
दरम्यान, त्यांची पौरुषत्व चाचणी सकारात्मक आल्याचे सांगण्यात आले. तेजपाल यांच्या रक्ताची चाचणी तसेच इतर चाचण्या करण्यात आल्या. सकाळी पाच तास त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा दुपारी सव्वातीन वाजता चाचण्यांसाठी रुग्णालयात आणले गेले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व्ही.एन.जिंदाल यांनी सांगितले, की चौकशी संस्थेच्या आवश्यकतेनुसार या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. तेजपाल यांची ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायकिअ‍ॅट्री अँड ह्य़ूमन बिहेवियर’ या संस्थेत नेऊनही चाचणी करण्यात आली. दरम्यान, तेजपाल यांना मानवतावादी तत्त्वावर खोलीत पंखा देण्यात यावा, या विनंतीअर्जावर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी शमा जोशी यांनी आदेश बुधवापर्यंत राखून ठेवला आहे.
सूत्रांनी सांगितले, की तेजपाल यांना पोलिस कोठडीत पंखा पुरवावा किंवा नाही याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. तहलकाच्या सदर महिला कर्मचाऱ्याने ७ व ८ नोव्हेंबर या दोन दिवशी गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तेजपाल यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार केली होती. त्यामुळे तेजपाल यांच्यावर ३५४ ए (महिलेचा विनयभंग) व ३७६ (२)(के)(ताब्यातील महिलेवर बलात्कार) हे आरोप ठेवले होते.
पोलिस कोठडीत पहिली रात्र तेजपाल यांना दोन खुनी गुन्हेगारांसमवेत काढावी लागली. दुसऱ्या दिवशी कोठडीत त्यांच्यासमवेत बेडूक व कासवांची शिकार करणारे चार स्थानिक गुन्हेगारही कोठडीत होते. तेजपाल यांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पणजी येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेजपाल यांना ८ बाय ४ च्या खोलीत ठेवले असून या खोलीची उंची केवळ ५ फूट आहे व भारतीय प्रसाधनगृहाची सोयही आहे.
तेजपाल हे दमलेले दिसत होते. जाबजबाबामुळे त्यांची झोप झालेली नव्हती त्यामुळे त्यांचे डोळे लाल व सुजलेले दिसत होते. त्यांचे कुटुंबीय आज गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत तेथे आले व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना गोव्याची पावभाजी दिली. त्यापूर्वी पोलिसांनी त्यांना चहा दिला होता. तेजपाल यांनी त्यांच्या समवेत असलेल्या चार गुन्हेगारांसमवेत संभाषण केले. डॅमियन कोलॅको, नतालो फर्नाडिस, लॉरेन्स कोलॅको व संतान कोलॅको यांच्यावर बेडूक व कासवांची शिकार केल्याचे आरोप आहेत. त्यांना हिंदी येत नसल्याने तेजपाल काय म्हणत आहेत हे त्यांना समजले नाही. कुठल्या गुन्ह्य़ासाठी तुम्ही कोठडीत आहात असे तेजपाल यांनी त्यांना विचारले, पण त्यांनी उत्तर दिले नाही. रात्री तेजपाल दोनदा पाणी पिण्यासाठी उठले. तेजपाल यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी सतरंजी आणली होती, पण न्यायालयाच्या अनुमतीअभावी गुन्हे अन्वेषण अधिकाऱ्यांनी ती वापरण्यास मनाई केली.

Story img Loader