पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (३० डिसेंबर) अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि महर्षि वाल्मिकी विमानतळाचं उद्घाटन करण्याकरता अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची पायाभरणीही केली. तसंच, अनेकांबरोबर सेल्फी काढून ऑटोग्राफही दिला. आजच्या दौऱ्यात सर्वांत लक्षवेधी घटना ठरली ती त्यांनी एका कुटुंबाच्या घरी दिलेली भेट. उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलिंडेर मिळालेल्या एका कुटुंबात जाऊन त्यांनी आज चहाचा आस्वाद घेतला. ज्यांच्या घरात त्यांनी भेट दिली, त्यांच्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचं नियोजन कसं झालं, मोदी घरी कसे आले, याबाबत सविस्तर माहिती या घरातील महिलेने दिली आहे. न्युज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आल्याची बातमी मीरा मांझी यांना समजली. तेवढ्यात त्यांच्या दारात एक अधिकारी आले. पुढील अर्ध्या तासात एक व्हीआयपी तुमच्या घरी येणार आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं. याबाबत मीरा मांझी म्हणाल्या, “ही घटना आमच्यासाठी आश्चर्यकारक होती. व्हीआयपी येणार एवढंच सांगितलं. पण कोण येणार हे सांगितलं नाही. आम्ही गरीब लोक आहोत. आमच्या घरात डाळ आणि तांदूळ याव्यतिरिक्त काही नाही. त्यामुळे मी डाळ-भात आणि कोशिंबीर बनवली. स्वयंपाक पूर्ण होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या घरी आले. आम्ही सर्वच आश्चर्यचकित झालो. हे सगळं मला स्वप्नवत वाटत होतं. या स्वप्नातून मी बाहेर पडले. कारण पंतप्रधानांचं मला स्वागत करायचं होतं.” न्युज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मीरा मांझी या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या १० कोटी लाभार्थ्यांपैकी आहे. त्यांना दारिद्र्यरेषेखालील मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आलं आहे.
मोदींना घरच्यांशी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात आल्यानंतर त्यांनी काय संवाद साधला याबाबतही मीरा मांझी यांनी ANI ला माहिती दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. माझ्या घरात बसले. माझ्या लहान मुलांना त्यांनी आधी विचारलं. मी हात जोडून नमस्कार केला. आम्हाला काय काय लाभ मिळाला असं त्यांनी विचारलं. मी बोलले की आवासचं घर आम्हाला मिळालं आहे. मोफत गॅस, पाणीही मिळालं. खूप आनंद होत आहे.”
हेही वाचा >> ‘२२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राम भक्तांना आवाहन
चहा जरा जास्त गोड आहे
“पूर्वी आम्ही चुलीवर जेवण बनवायचो, आता गॅसवर बनवत आहोत. खूप आनंद होत आहे. मोदींनी पुढे विचारलं गॅसवर काय बनवलं आहे, मी म्हटलं डाळ-भात आणि भाजी बनवली आहे. त्यांनी विचारलं अजून काय बनवलं आहे, तर मी म्हटलं चहा बनवलाय. ते म्हणाले की द्या मग चहा. थंडीत चहा द्यायला पाहिजे. मी त्यांना चहा दिला. ते म्हणाले चहा तर खूप गोड आहे. मग मी म्हणाले माझ्या हातून गोडच चहा बनतो”, असंही मीरा मांझी म्हणाल्या.
“माझ्या घरात मी, नवरा, दोन मुलं आणि सासू-सासरे आहोत. पूर्वी आम्ही चुलीवर जेवण बनवायचो. पण आता आम्हाला उज्ज्वला योजनेतून लाभ मिळाला आहे. आता आम्हाला अजून थोडा वेळ मिळेल”, असंही मीरा मांझा आनंदाने सांगत होत्या.