टाटा मोटर्सने इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात पाऊल रोवण्यास सुरूवात केली आहे. फोर्ड इंडियाचा गुजरातच्या सानंद येथील बंद पडलेला वाहन निर्मिती कारखाना टाटा मोटर्सने ७२५.७ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. फोर्ड इंडिया आणि टाटा मोटर्समध्ये झालेल्या करारानुसार कारखान्याची जागा, इमारती, वाहन निर्मिती युनीट, मशीन आणि कर्मचारी टाटा मोटर्सच्या ताब्यात जाणार आहे.
करारानुसार, फोर्ड आपला पॉवरट्रेन प्लॉंट सुरू ठेवणार आहे. या प्रकल्पाची इमारत आणि जमीन टाटा मोटर्सकडून पुन्हा भाडेतत्त्वार घेण्यात येईल. तसेच टाटा मोटर्सच्याकडून कारखान्यात काम करणाऱ्या काम करणाऱ्या फोर्ड इंडियाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्यात येणार नाही, टाटा मोटर्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तीन हजार कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
हेही वाचा – “बंड झाले, आता थंड झाले?, तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण…”; ‘मनसे’च्या एकमेव आमदाराचा शिंदे सरकारला टोला
फोर्ड इंडियाचा साणंद प्लांट ३५० एकरांचा आहे. तर इंजिन निर्मितीचे कारखाने ११० एकरात आहेत. या वर्षी मे महिन्यात टाटा मोटर्सला फोर्डच्या पॅसेंजर कार निर्मिती प्रकल्पाच्या ताब्यात घेण्यासाठी मंजुरी मिळाली. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. फोर्ड मोटर कंपनीने गेल्या वर्षी भारतातून आपला व्यवसाय गुंडाळण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, “आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने प्रगतीशील पाऊल टाकून टाटा मोटर्स भारतीय वाहन उद्योगाच्या वाढीला आणि विकासाला गती देईल”, अशी प्रतिक्रिया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी दिली आहे.