TATA Moters Passenger Vehicle Price Hike : टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी गाड्यांच्या किंमतीत पुन्हा वाढ केली आहे. वाढत्या लागतीमुळे ही दरवाढ करण्यात आली असल्याचे टाटा मोटर्सच्यावतीने सांगण्यात आले आहे. ही दरवाढ त्वरीत लागू होईल, असेही टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
टाटा मोटर्सने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी गाडांच्या वाढत्या दराबाबत माहिती दिली. प्रवासी गाड्यांचे व्हेरिएंट आणि मॉडेलच्या आधारावर त्याच्या किंमतीमध्ये शनिवारपासून 0.55 टक्के सरासरी वाढ लागू होईल, असे म्हटले आहे. तसेच कंपनीने गाड्यांच्या लागत किंमती वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या उपाय योजना केल्या आहेत. दरवाढ ही त्यापैकीच एक असल्याचे टाटा मोटर्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 1.5 – 2.5 टक्क्यांनी वाढ केली होती. आता प्रवासी वाहनांच्या दरातही टाटा मोटर्सकडून दरवाढ करण्यात आली आहे. तसेच देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीनेही गेल्या एप्रिलमध्ये सर्व मॉडेल्सच्या किमती सरासरी १.३ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. मारुती सुझुकीने ६ एप्रिल रोजी दरवाढीची घोषणा केली होती. याआधी १ एप्रिलपासून मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, टोयोटा या कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या किमतीत २.५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती.