टाटा मोटर्स कंपनीने आपल्या कंपनीतून पदनाम हा प्रकारच हद्दपार केला आहे. टाटा मोटर्समध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावासमोरुन पद टाटा मोटर्सने हटवले आहे. एक दोन नाही तर तब्बल दहा हजार पदे टाटा मोटर्सने रद्द केली आहेत. त्यामुळे आता टाटा मोटर्समध्ये कोणीही बॉस असणार नाही. आता नव्या नियमानुसार टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर, सिनीयर मॅनेजर, सिनीयर जनरल मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट, सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट अशी सगळी पदं हद्दपार केली आहेत. कंपनीच्या कामकाजात समानता आणण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय टाटा मोटर्सने घेतला आहे. यासंबंधीचा एक आदेशच टाटा मोटर्सने काढला आहे. कंपनीने काढलेल्या या आदेशानुसार आता विशिष्ट पद अस्तित्त्वात नसेल. मॅनेजर्सना टीम हेडचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या नावापुढे त्यांचा विभाग असेल. अमुक एका विभागाचा हेड असे त्याला संबोधले जाईल. इतर पदांच्याबाबतीतही असाच निर्णय घेतला आहे.
मॅनेजर दर्जाच्या खाली असलेल्या पदांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीतल्या एकूण १० हजार कर्मचाऱ्यांना या नव्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे असे टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. फक्त टाटा मोटर्सच नाही तर इतरही अनेक कंपन्यांनी आपल्या कंपन्यांमधल्या १४ लेव्हल या ५ लेव्हल्सवर आणल्या आहेत. टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा पद भुषवणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असे टाटा मोटर्सचे वरिष्ठ एच.आर. गजेंद्र चंदेल यांनी म्हटले आहे. कंपनीच्या नव्या धोरणामुळे काम करण्याच्या वातावरणात निश्चित सकारात्मक बदल होतील. तसेच वातावरण अधिकाधिक कर्मचारी केंद्रीत होण्याचा प्रयत्न होईल असेही चंदेल यांनी स्पष्ट केले आहे.