टॅटू काढण्याचं फॅड काही नवं नाही. लोक आपापल्या आवडी-निवडीनुसार चित्र-विचित्र टॅटू काढून चर्चेत येण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आता अशाच प्रकारे चर्चेत येण्यासाठी काढलेल्या एका टॅटूमुळे बंगळुरूमधील एक टॅटू आर्टिस्ट कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. या टॅटू आर्टिस्टने थेट पोलिसांशी पंगा घेणारा टॅटू काढून त्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केला होता. बंगलुरुमधील कब्बन पार्क पोलिसांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली असून टॅटू आर्टिस्ट रितेश अघारियावर (४१) गुन्हा दाखल केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा : “काहींना महापुरूष आणि नंतर देव बनायचं असतं”, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?

पोलिस उपनिरीक्षक चेतन एस. जी. यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जेव्हा ते मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास समाज माध्यमांवरील पोस्ट्स पाहत होते, तेव्हा त्यांना हा फोटो दिसला. या फोटोमध्ये छातीवर उजव्या बाजूला ‘F*** the police’ असा टॅटू काढलेला दिसून येत आहे. चेतन यांनी तातडीने या फोटोचा तपास सुरु केला. त्यांना आढळले की, ‘Tattoo.Sutra’ या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. ‘एक्स’वर @TilakSadive या अकाऊंटने त्या स्टोरीचा स्क्रीनशॉट काढून तो ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत पोलिसांना टॅग केले होते. ते अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सूचना करत लिहिले होते की, ““@BlrCityPolice कृपया, याकडे लक्ष द्या.”

चेतन यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने प्राथमिक तपास पूर्ण केला आणि हे प्रकरण आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातले. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनंतर चेतन यांनी तक्रार दाखल केली. अशा प्रकारचे फोटो आक्षेपार्ह असून ते समाज माध्यमांवर पोस्ट केल्याने पोलीस विभागाचा अपमान आणि बदनामी होते. त्याच रात्री, पोलिसांनी या अपमानास्पद टॅटू काढणाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. पोलिसांनी ‘Tattoo.Sutra’च्या इंस्टाग्राम पेजचा अधिक तपास केला आणि त्यांना लक्षात आले की हा फोटो सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोस्ट करण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्ही दंडाधिकारी न्यायालयाकडून परवानगी घेतली आणि दुसऱ्या दिवशी एफआयआर नोंदवला. नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.” शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या हेतुपुरस्सर अपमानासाठी हे कलम लावले जाते.

हेही वाचा : “देव माझ्या बाजूने…” गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग…

पुढे पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्ही आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पुन्हा समन्स बजावल्यावर तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या. आपण इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याची त्याने कबूलीही दिली. त्याने म्हटले की, एका परदेशी व्यक्तीने आपल्या छातीवर त्याच्या दुकानामध्ये येऊन हा टॅटू काढून घेतला होता. तो म्हणाला की, जुने काही फोटो पाहत असताना नजरचुकीने तो फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट झाला. त्या ग्राहकाबाबतची सविस्तर माहिती आपल्याला आठवत नसल्याचा दावाही त्याने केला. समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या जाणाऱ्या मजकुरांवर आमचे बारीक लक्ष असते. जर कुणी अपमानास्पद अथवा आक्षेपार्ह काही पोस्ट करत असेल तर आम्ही त्याच्याविरोधात कारवाई करतो. अशाप्रकारच्या कृत्यामध्ये लोकांनी सहभागी होऊ नये यासाठी ताकीदही देतो.”