Himachal Pradesh Tax on Toilet Seat : नागरिकांनी भरलेल्या करातून राज्य सराकरचा गाडा चालत असतो. त्यामुळे सरकारचं बजेट कोलमडलं की अर्थनिर्मितीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. असात प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये घडला आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या हिमाचल प्रदेश सरकारने नागरिकांवर आता शौचकुपांचाही कर लावला आहे. एवढंच नव्हे तर शहरी भागातील घरातील प्रत्येक शौचकुपामागे कर आकारण्यात येणार आहे. या संदर्भात सरकारने नुकतीच अधिसूचना काढली आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सरकारच्या अधिसूचनेनुसार नागरिकांना सीवरेज बिलासह शहरी भागात बांधलेल्या टॉयलेट सीटसाठी २५ रुपये अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. हे अतिरिक्त शुल्क जलशक्ती विभागाच्या खात्यात वर्ग केलं जाणार आहे.
सीवरेज बिल हे पाणी बिलाच्या ३० टक्के असेल, असं सरकारी अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. नागरिकांना दर महिन्याला प्रति टॉयलेट सीटमागे २५ रुपये भरावे लागणार आहेत. विभागाने सर्व विभागीय अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पाण्याच्या बिलासह येणार सीवरेज बिल
यानिमित्ताने हिमाचल प्रदेशमध्ये पहिल्यांदाच पाण्याची बिले दिले जाणार आहेत. ऑक्टोबरपासून प्रति कनेक्शन १०० रुपये पाणी बील नागरिकांना भरावं लागणार आहे. तसंच प्रति शौचकुपाचे २५ रुपयेही आकारण्यात येणार आहेत. शहरी भागातील लोकांच्या घरात अनेक शौचालये असतात. त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हिमाचल प्रदेशात एकूण ५ महानगरपालिका, २९ नगरपालिका आणि १७ नगर पंचायती आहेत. यामध्ये सुमारे १० लाख लोक राहतात. त्यामुळे नवीन सरकारी आदेशाचा राज्यातील मोठ्या लोकसंख्येवर परिणामी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेस सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील विरोधी पक्षांनी टीका केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही एक्सवर पोस्ट करून टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता ही लोकचळवळ बनवली.परंतु, आता काँग्रेस सरकार शौचालयासाठी लोकांवर कर लावत आहे. त्यांनी त्यांच्या काळात चांगली स्वच्छता केली नाही याची लाज वाटते, पण हे पाऊल देशाला लाजवेल!”, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.
“हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार आता नागरिकांना त्यांच्या घरी असलेल्या शौचालयांच्या संख्येवर आधारित कर आकारणार आहे. तुम्ही बरोबर वाचलंय. टॉयलेट सीटची संख्या! पंतप्रधान मोदी शौचालय बांधत आहेत, काँग्रेस त्यांच्यावर कर लावत आहे. ‘बकवास’ नेतृत्व हेच करते”, असं भाजपाचे नेते अमीत मालविय यांनी ट्वीट केलं आहे.