देशातील व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी संस्कृती संपविण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचललेली असतानाच टोलनाक्यावर अडवले गेले म्हणून सत्ताधारी पक्षातील खासदाराच्या चिरंजीवांनी टोलनाक्यावर धुडगूस घातला. खासदार महाशयांच्या पुत्राने टोलनाक्यावर तोडफोड केल्याचा व्हिडिओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांपैकी एक असलेल्या तेलुगु देसम पक्षाचे खासदार निम्मला क्रिस्तप्पा यांचा मुलगा अंबरिश याने कर्नाटकमधील बागेसपल्ली येथे टोलनाक्यावर गोंधळ घातला.
Karnataka:TDP MP Nimmala Kristappa's son vandalised Bagespalli toll gate after staff stopped his vehicle. Toll gate operators filed case pic.twitter.com/sOJfRIfumw
— ANI (@ANI) April 24, 2017
हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये असणारी व्यक्ती ही अंबरिश असल्याचे एएनआयने म्हटले आहे. कर्नाटकातील बेगसापल्ली येथे टोलनाक्यावर अंबरिशची कार थांबवण्यात आली. आपली कार का थांबवली असे म्हणून अंबरिशने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे रुपांतर भांडणात झाले. अंबरिश कार खाली उतरला आणि त्याच्यासोबत असणारे त्याचे मित्र देखील खाली उतरले. त्यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना धमकी देण्यास सुरुवात केली. टोलबूथला काचा होत्या. काचेचे दरवाजे त्यांनी फोडले. कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा विशेष आहे त्यामुळे कुणाच्याही वाहनावर लाल दिव्याची काय आवश्यकता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले होते. १ मे पासून वाहनावरील लाव दिव्याला बंदी असेल. देशातील मंत्र्यांनी तसेच काही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या वाहनांवरील लाल दिवे काढून टाकले आहेत. सर्वांना समान वागणूक मिळावी ही त्यामागील भावना आहे परंतु टोलनाक्यावर अडवले म्हणून टोलनाक्याची तोडफोड करणे हा धक्कादायक प्रकार आहे.
याआधी देखील नेत्यांनी किंवा त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी टोलनाक्यावर गोंधळ घातल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अलीकडेच गुरगाव येथील टोलनाक्यावर कागदपत्रांची मागणी केली असता माजी जिल्हा परिषद सदस्याने टोलची तोडफोड केली होती. असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावी अशी मागणी ट्विटरवर लोकांनी केली आहे.