गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेत १३३ जणांनी प्राण गमावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेची हृदयद्रावक दृश्य समोर आली आहेत. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी या थरारक घटनेची माहिती दिली आहे. “मी या ठिकाणी दर रविवारी चहा विकतो. या दुर्घटनेनंतर पुलाच्या केबलवर काही जण लटकत होते आणि त्यानंतर ते पाण्यात पडले. हे दृश्य पाहिल्यानंतर मी रात्रभर झोपलो नाही. संपूर्ण रात्रभर मी पीडितांची मदत केली. सात ते आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला डोळ्यांसमोर मरताना पाहून मन हेलावून गेलं. माझ्या आयुष्यात मी अशाप्रकारची घटना कधीही पाहिली नव्हती”, अशी आपबीती या परिसरातील चहा विक्रेत्यांनं सांगितली आहे.
विश्लेषण: मोरबीमध्ये १४३ वर्ष जुना पूल कोसळला, हा पूल कोणी बांधला? जाणून घ्या इतिहास…
दरम्यान, या पूल दूर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आले. पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला. गर्दीमुळे आणि काही तरुणांच्या कृत्यामुळे या पुलाला धोका असल्याची त्यांची भीती अखेर खरी ठरली.
या दुर्घटनेतून बचावलेले मेहुल रावल यांनी या पुलावर ३०० लोक जमले होते, अशी माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेदरम्यान स्थानिकांनी पुढे येत अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत. या दुर्घटनेतून बचावलेले लोक आपल्या आत्मस्वकियांचा शोध घेत आहेत. लष्कर, वायू दल, नौदलासह एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य राबवण्यात येत आहे.