उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थ्यांना एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजं असताना आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे.
याप्रकरणी आरोपी शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. तर मुख्याध्यापक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे), ५०४ (जाणूनबुजून अपमान करणे), ५०६ (धमकावणे) आणि बाल न्यायाचं कलम ७५ (मुलांशी क्रूरता) अंतर्गत शिक्षक आणि मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
कठुआ येथील या प्रकारानंतर उपायुक्तांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. याबाबतची माहिती उपायुक्तांनी स्वत: अधिसूचना जारी करत दिली. या समितीमध्ये बानीचे उपविभागीय दंडाधिकारी, कठुआचे उप शिक्षणाधिकारी आणि खरोटे येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांचा समावेश आहे.