बंगळुरू येथील ‘मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) या शैक्षणिक संस्थेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका प्राध्यापकाने वर्ग सुरू असताना एका मुस्लीम विद्यार्थ्याचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकाला निलंबित केलं आहे.
वर्ग सुरू असताना प्राध्यापकाने मुस्लीम विद्यार्थ्याला ‘दहशतवादी’ म्हटल्यानंतर संबंधित विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये युक्तीवाद झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली आहे. “या देशात मुस्लीम असणं आणि रोज अशा प्रकारची टिप्पणी सहन करणं, ही मजेशीर बाब नाही,” असे विद्यार्थी प्राध्यापकाला उद्देशून बोलताना व्हिडीओमध्ये ऐकू येतं आहे.
हेही वाचा- Mangaluru Blast : आरोपी मोहम्मद शरीक झाकीर नाईक कनेक्शन? मोबाईलमध्ये सापडली धक्कादायक माहिती
यावर शिक्षकाने उत्तर दिलं की, “तू माझ्या मुलासारखा आहेस.” त्यावर संबंधित विद्यार्थी म्हणाला “तुम्ही तुमच्या मुलाशी असं बोलू शकता का? तुम्ही त्याला दहशतवादी म्हणू शकता का? इतक्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही मला असं कसं काय म्हणू शकता? हा एक वर्ग आहे आणि तुम्ही प्राध्यापक आहात. “
विद्यार्थ्याच्या या प्रत्युत्तरानंतर संबंधित शिक्षक व्हिडीओमध्ये माफी मागताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एमआयटीने संबंधित प्राध्यापकाला निलंबित केलं असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.