प्रेमात वय पाहिलं जात नाही, असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेशमधून समोर आला आहे. येथे एका २२ वर्षीय शिक्षिकेचं १६ वर्षीय मुलावर प्रेम जडलं. त्यानंतर आता ही शिक्षिका मुलाला घेऊन पळून गेली आहे. ही माहिती समोर आल्यावर मुलाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी नोएडा ११३ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिक्षिका आणि मुलाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर १२३ येथे २२ वर्षीय शिक्षिका घरी शिकवणी घेत होती. या शिकवणीला घरासमोरील १६ वर्षीय एक मुलगाही येत होता. तेव्हाच शिक्षिका आणि १६ वर्षीय मुलामध्ये प्रेमाचं सुत जुळलं. रविवारी हे दोघेही पळून गेले. रविवारी मुलगा १.३० वाजता काकूच्या घरी जात असल्याचं सांगून बाहेर पडला होता. पण, सायंकाळपर्यंत तो घरी आला नाही, अशी माहिती मुलाच्या वडिलांनी दिली.
हेही वाचा : BJP-SP ची अशीही युती, सपा नेत्याच्या २६ वर्षीय मुलीसोबत भाजपाचा ४७ वर्षीय नेता फरार; गुन्हा दाखल!
यानंतर मुलाच्या वडिलांनी नोएडा ११३ येथील पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला. शिक्षिकेने मुलाला फूस लावून पळवून नेले, असं वडिलांनी पोलिसांना सांगितलं आहे. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त आशुतोष द्विवेदी यांनी म्हटलं की, तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा तरुणीजवळ शिकवणीसाठी जात होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे. लवकरच दोघांचा तपास लागेल, असं द्विवेदी म्हणाले.