नव्या पिढीला घडविण्यासाठी शिक्षकांनी जगातील बदल आत्मसात केले पाहिजे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिक्षकांना दिला. त्याचबरोबर शिकवणे हा केवळ एक व्यवसाय नसून, जीवनधर्म असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ३५० शिक्षकांशी मोदी यांनी गुरुवारी संवाद साधला. या सर्व शिक्षकांचा शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
मोदी म्हणाले, शिक्षक कधीही निवृत्त होत नसतो. नव्या पिढीला घडविण्याचे काम त्याच्याकडून अव्याहतपणे सुरू असते. जर समाजाला प्रगती करायची असेल, तर शिक्षकाने कायम काळाच्या दोन पावले पुढेच असले पाहिजे. जगात घडत असलेल्या बदलांना त्यांनी आत्मसात केले पाहिजे आणि मुलांमध्ये बदलांबद्दल उत्सुकता निर्माण करून त्यांना तयार केले पाहिजे.
गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यावर शाळेतील मित्रांना भेटण्याची आणि शिक्षकांचा सत्कार करण्याची माझी इच्छा होती. या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्याचे मोदी यांनी सांगितले. कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण असते, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा