भ्रष्टाचाराला वेसण घालण्यासाठी जनलोकपाल विधेयकाच्या मागणीवरून देशव्यापी आंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीम अण्णाची दुसरी आवृत्ती काढली आहे. राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी बाहेर पडल्यावर अण्णा हजारे यांनी १५ सहकाऱ्यांची नवी टीम तयार केली आहे.
अण्णा हजारे यांनी आज महाराष्ट्र सदन येथे टीम अण्णामधील जुन्या सदस्यांसोबत चर्चा करून पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली. आंदोलनाला चालना देण्यासाठी अण्णा हजारे यांनी दक्षिण दिल्लीतील सवरेदय एन्क्लेव्ह येथे नवे कार्यालय थाटण्याचे ठरविले असून त्याचे रविवारी उद्घाटन करण्यात येईल.
जनलोकपाल विधेयकाचे आंदोलन मृतवत झाल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. पण आमचे आंदोलन कधीही थांबलेले नाही, असे नव्या टीमची घोषणा करताना अण्णांनी सांगितले. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येत्या ३० जानेवारीपासून जनलोकपाल विधेयकासाठी देशव्यापी दौरा करण्याचे ठरविले असून त्याची सुरुवात बिहारपासून करण्यात येईल, असे अण्णांनी सांगितले. १५ सदस्यांच्या कोअर समितीच्या बैठकीला न्या. हेगडे आणि व्ही. पी. सिंह पोहोचू शकले नाहीत. अण्णांसोबत किरण बेदी आणि मेधा पाटकर, अखिल गोगोई आणि अन्य सदस्य उपस्थित होते.  
जनलोकपाल विधेयकावर सरकारची नियत साफ नाही. आम्हाला सरकारी लोकपाल विधेयक अजिबात मान्य नाही, असे सांगून अण्णांनी सर्व आंदोलकांनी एकजूट होऊन जनलोकपाल विधेयकासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा