अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा संस्था म्हणजे एनएसएमध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी आता एओएल, अॅपल, याहू, गुगल, फेसबुक, लिंकड्इन, ट्विटर व मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी आता ओबामा प्रशासन व अमेरिकी काँग्रेसवर दडपण आणले आहे.
एनएसए या संस्थेची काही वर्गीकृत कागदपत्रे सीआयएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने फोडली होती व अलिकडच्या घडामोडीनुसार एनएसएने नुसती इंटरनेटवर टेहळणी केली असे नाही तर अनेक नागरिकांच्या सेलफोनवरूनही माहिती घेतली आहे. लोकांची खासगी संभाषणेही त्यांनी टिपली असून तंत्रज्ञान कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणांचे यात उल्लंघन एनएसएनेच केल्याचे उघड झाले आहे.
या तंत्रज्ञान कंपन्यांनी ओबामा प्रशासन व अमेरिकी काँग्रेसला असे सांगितले आहे, की टेहळणीचे काम हे कायदेशीर मर्यादेत झाले पाहिजे व त्यात पारदर्शकता व धोके यांचाही विचार केला पाहिजे. ज्या देशांमधून अमेरिकेला माहिती दिली जात नाही, त्या देशांत सेवा देण्यापासून आमच्यासारख्या तंत्रज्ञान कंपन्यांना अमेरिका टेहळणी कार्यक्रमाअंतर्गत रोखू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
‘याहू’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मरिसा मेयर यांनी सांगितले, की वापरकर्त्यांचे खासगी हक्क जपणे हे याहूचे कर्तव्य आहे. अमेरिकेच्या एनएसए या संस्थने जी टेहळणी केले व त्याचे बिंग फुटले, त्यामुळे आमच्या वापरकर्त्यांचा विश्वास कमी झाला आहे, त्यामुळे अमेरिका सरकारने आता नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी काही बदल करणे गरजेचे आहे.
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज यांनी सांगितले, की वापरकर्त्यांच्या माहितीची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे व त्यासाठी आम्ही सांकेतिकता (एनक्रिप्सशन) तंत्रज्ञानावर एवढा खर्च करीत असतो. त्यामुळे सरकार जी माहिती मागते त्याबाबतही पारदर्शकतेची अपेक्षा करतो.
टेहळणी म्हणजे व्यक्तिगततेचे फार मोठे उल्लंघन!
एओएल, अॅपल, याहू, गुगल, फेसबुक, लिंकड्इन, ट्विटर व मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व काँग्रेसच्या सदस्यांना उद्देशून वृत्तपत्रात एक जाहिरात दिली असून ते एक खुले पत्र आहे. काही देशांत नागरिकांच्या खासगी हक्कांचे फारच मोठे उल्लंघन करण्यात आले आहे व एक प्रकारे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली गेली आहे त्यामुळे यात बदल झाला पाहिजे असे या पत्रात म्हटले आहे.