Bengaluru Shocker : बंगळुरूतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बंगळुरूच्या आरएमव्ही सेकंड स्टेज भागात भाड्याने राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनअरच्या घरात चार जणांचे मृतदेह आढळळे आहेत. अनुप कुमार (३८), पत्नी राखी (३५), त्यांची पाच वर्षांची मुलगी अनुप्रिया आणि २ वर्षांचा मुलगा प्रियांश अशी मृतांची नावे आहेत. यांनी सामूहिक आत्महत्या केली की हा घातपाचा प्रयत्न आहे याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हे कुटुंब मुळचं उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आहे. अनुप कुमार बंगळुरूत एका खासगी कंपनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कामानिमित्त ते उत्तर प्रेदशातून बंगळुरू येथे स्थायिक झाले. सोमवारी सकाळी त्यांच्या घरात काम करणारी मदतनीस घरी आली. तिने बराचवेळ दार ठोठावूनही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने तत्काळ शेजाऱ्यांना याबाबत सांगितलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. पोलिसांनी घराचे दार उघडताच त्यांना समोर चार मृतदेह आढळले. यामध्ये अनुप कुमार, त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृतदेह होता.
मुलगी स्पेशल चाईल्ड
IANS या वृत्तसंस्थेनुसार, प्राथमिक तपासात समोर आले आहे की, अनुप आणि राखी यांनी त्यांच्या मुलांवर आधी विषप्रयोग केला. त्यानंतर या जोडप्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांची पाच वर्षीय मुलगी अनुप्रियाची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे हे कुटुंब तणावात होतं. अनुप्रिया स्पेशल चाईल्ड होती. हे जोडपं पाँडिचेरीला जाणार होतं. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होतं. त्यानिमित्ताने त्यांनी रविवारीच पॅकिंग पूर्ण केली होती. परंतु, त्याआधीच त्यांचे मृतदेह सापडले.
घरात तीन मदतनीस
या कुटुंबाने तीन जणांना मदतनीस म्हणून ठेवले होते. दोघेजण स्वयंपाकी आणि एक जण केअर टेकर होता. प्रत्येकाला १५ हजार रुपये पगार दिला जायचा. दरम्यान, या प्रकरणी घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा वेगळ्या बाजूनेही विचार केला जाणार आहे. सदाशिवनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.