Atul Subhash Suicide Case: गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूमध्ये झालेल्या एका आत्महत्या प्रकरणाची देशभरात चर्चा पाहायला मिळत आहे. अतुल सुभाष नामक व्यक्तीने बंगळुरूमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. पण आत्महत्येपूर्वी अतुल सुभाष यांनी एक मोठा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यात सर्व आपबीती कथन केल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी त्यांची पत्नी निकिता, सासू निशा, निकिताचा भाऊ अनुराग व काका सुशील यांना अटक केली आहे. पण आता निकितानं आपल्या जबाबात वेगळाच दावा केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अतुल सुभाष यांचा मृतदेह बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांच्या मृतदेहासोबत २४ पानांची सुसाईड नोट सापडली. त्याचबरोबर अतुल सुभाष यांनी जवळपास ९० मिनिटांचा एक व्हिडीओही रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी निकितावर मानसिक छळ केल्याचे आरोप केले होते. यानंतर घरगुती हिंसाचारासंदर्भातले कायदे, महिलांच्या बाजूने केला जाणारा विचार आणि पुरुषांवरील मानसिक ताण याबाबत मोठी चर्चा सुरू झाली.
अतुल सुभाष यांनी आपल्या पत्रात आणि व्हिडीओमध्ये अनेक गंभीर आरोप निकितावर केले आहेत. निकिता आपला छळ करत असून आपल्याविरोधात ८ खोट्या पोलीस तक्रारी तिनं दाखल केल्या. तसेच, जौनपूरमधील कौटिंबिक न्यायालयातील न्यायाधीशांनीही भेदभाव करत पत्नीच्या बाजूनेच निकाल दिल्याचा दावा अतुल सुभाष यांनी केला. तसेच, पत्नीच्या घरच्या मंडळींकडून पैशांसाठी आपला जाच केला जात असल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं. घटस्फोट हवा असल्यास ३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, मुलाला भेटण्यासाठीही पैसे मागितले, असा दावा त्यांनी व्हिडीओत केला.
निकितानं सर्व आरोप फेटाळले
दरम्यान, निकिता सिंघानियाची पोलिसांनी चौकशी केली असता आपल्या जबाबात तिने सर्व आरोप फेटाळले आहेत. अतुलच आपला छळ करत होता, असं निकितानं जबाबात म्हटल्याचं वृत्त बिझनेस टुडेनं दिलं आहे. तसेच, “मी गेल्या तीन वर्षांपासून अतुलपासून वेगळी राहात होते. जर मी खरंच पैशांसाठी त्याचा छळ केला असता, तर इतका काळ मी त्याच्यापासून वेगळी राहिलेच नसते”, असा दावा निकिताने केला आहे.
निकिता, तिचा आई निशा व भाऊ अनुराग सिंघानिया यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पण निकिताचे काका सुशील सिंघानिया यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
मूळचे बिहारचे असणारे अतुल सुभाष यांची दिल्लीच्या निकिता सिंघानियाशी मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली. २०१९ ला झालेली ही ओळख वाढली आणि २०२१ मध्ये त्यांनी विवाह केला. सुरुवातीच्या काही महिन्यांत सारंकाही ठीक चाललं होतं पण नंतर त्यांच्यात खटके उडू लागले. आपल्या व्यवसायासाठी निकिताचे कुटुंबीय अतुल सुभाष यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करून त्यांच्यावर त्यासाठी दबाव टाकत होते, असा आरोप सुभाष यांनी पत्रात व व्हिडीओमध्ये केला आहे. या वादांमुळे लग्नानंतर काही महिन्यांतच २०२१ मध्येच निकिता अतुल सुभाष यांना सोडून तिच्या माहेरी राहू लागली होती. २०२२ मध्ये निकितानं अतुल सुभाष यांच्याविरोधात अनेकदा पोलीस तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यात हुंड्यासाठी छळ करणे आणि अगदी हत्येचा प्रयत्न करणे अशा प्रकारांचा समावेश होता, असा आरोपही सुभाष यांच्या पत्रात करण्यात आला आहे.