मध्य प्रदेशमधील एका वाघाच्या हालचाली टिपण्याकरिता त्याच्या शरीरावर बसविण्यात आलेली ‘डिजिटल कॉलर’ हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यातील एका सायबरतज्ज्ञाने हा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल नोंदविला असून अधिक तपास सुरू केला आहे.
पन्ना- २११ या वाघाला नुकतेच पन्ना येथील व्याघ्र संवर्धन प्रकल्पातून सातपुडा येथील व्याघ्र संवर्धन प्रकल्पात हलविण्यात आले होते. सदर वाघाच्या मानेवर ‘इरिडियम सॅटेलाइट’ कॉलर बसविण्यात आली होती. वाघाच्या हालचाली टिपणे हे यामागील उद्दिष्ट होते. मध्य प्रदेशात सहा व्याघ्र प्रकल्प
आहेत.
मात्र २४ जुलैपासून सदर ‘कॉलर’ बंद असल्याचे आढळले. सोमवारी मध्य प्रदेशचा वन विभाग आणि ‘वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त बैठकीत या मुद्दय़ावर तपशीलवार चर्चा करण्यात आली. संबंधित वाघावर ‘कॅमेरा ट्रॅप’च्या मदतीने नजर ठेवण्यात आली असून यापुढेही सहा महिने त्या वाघावर पाळत ठेवण्यात येणार आहे. सातपुडा प्रकल्पातील वातावरणाशी वाघाने एकदा जुळवून घेतले की मग ‘कॉलर’च्या जागी नवी अत्युच्च वारंवारतेची नवी कॉलर बसविण्यात यावी, असेही या बैठकीत ठरले.
ही अत्यंत गंभीर बाब असून पुण्यातील ‘त्या’ सायबरतज्ज्ञाचा माग काढण्यात येणार आहे. तसेच या ‘हॅकिंग’मागील कारण काय होते याचाही परामर्श घेण्यात येणार असल्याची माहिती भोपाळमधील वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रातील कार्यकर्ते अजय दुबे यांनी दिली.

Story img Loader